चीनच्या सीमेवर भारताचे ५० सहस्र सैनिक तैनात !

जम्मू-काश्मीर आणि आसाम राज्यांत मात्र आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सैनिक नसल्याचे उघड !

नवी देहली – लेहमधील भारत-चीन सीमा सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी भारतीय सैन्याची पुनर्रचना केली आहे. लडाख भागात सैन्याच्या ६ नव्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्या अगोदर आतंकवादविरोधी कारवायांच्या विरोधात लढण्यासाठी आणि पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. यामुळे अनुमाने ५० सहस्र सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. भारताने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्याने घुसखोरीचा कोणताही प्रयत्न शक्य होणार नाही, असा संदेश चिनी सैन्यालाही गेला आहे.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राष्ट्रीय रायफल्स’ची एक तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. आता त्या तुकडीला पूर्व लडाख सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहे.

२. तेजपूर येथील ‘गजराज कॉर्प्स’च्या अंतर्गत आसाममधील एक तुकडी राज्यातील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी तैनात करण्यात आली होती. आता मात्र त्या तुकडीला भारत-चीनच्या ईशान्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

३. सैन्याची तुकडी कमी केल्यामुळे आता आसाममध्ये आतंकवादविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही तुकडी नसल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे, हे भारतीय शासनकर्त्यांनी ओळखून तशी व्यूहरचना करायला हवी !
  • गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्याने गाजवलेला पराक्रम पाहून चीनही सावधतेने पावले उचलत आहे. त्यामुळे शक्तीसह चीनवर मानसिक दबाव बनवण्यासाठीही आता अधिक जोमाने प्रयत्न होणे अपेक्षित !