न्यूयॉर्क राज्यातील बफेलो शहरातील एका सुपरमार्केटमध्ये एका तरुणाने गोळीबार केला. त्यात १० जण ठार, तर ३ जण घायाळ झाले आहेत. या १३ जणांमध्ये ११ जण कृष्णवर्णीय, तर २ जण श्वेतवर्णीय आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे कृष्णवर्णियांवरील आक्रमण होते का ? यादृष्टीने अन्वेषण चालू केले आहे. अमेरिकेत तेथील नागरिकांकडून स्वत:च्या नागरिकांवरच आक्रमणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यात वर्णद्वेषी संघर्षाचे प्रकार अधिक आहेत. यापूर्वी तेथील कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड या व्यक्तीच्या मानेवर तेथील श्वेतवर्णीय पोलिसाने पाय ठेवल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषी हिंसाचाराच्या घटना अनेक राज्यांमध्ये झाल्या होता. अमेरिकेने भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनपेक्षितरित्या ‘अमेरिका भारतातील हिंसाचाराच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे’, असे विधान केले होते. त्यावर जयशंकर यांनी प्रत्युत्तर देत ‘आम्हालाही अमेरिकेतील मानवाधिकारांच्या घटनांविषयी चिंता व्यक्त करण्याचा अधिकार आहे’, असे ठणकावले होते. अमेरिकेत निष्पाप नागरिकांच्या हत्या होत असतांना अमेरिका इतर देशांवर आणि विशेषत: भारतावर लक्ष ठेवू पहाते, हे किती हास्यास्पद आहे ? हे यातून दिसून येते.
जी अमेरिका स्वत:च्या देशातील वांशिक हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तिला म्हणे भारताची चिंता ! भारतात अठरापगड जाती, अनेक धर्म, पंथ असूनही एका विशिष्ट समुदायाकडून जाणीवपूर्वक घडवल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या व्यतिरिक्त हिंसाचार कुठे होतो ? अमेरिकेत सर्वसामान्य नागरिकांना बंदुका, रायफल यांचे परवाने सहज मिळतात. कोविडच्या काळात तर तेथे नागरिकांनी स्वरक्षणासाठी अधिक संख्येत शस्त्रे खरेदी केली होती. त्यांचा उपयोग नागरिक एकमेकांना मारण्यासाठी करणार नाहीत कशावरून ? ३ वर्षांपूर्वी तेथील भारतीय नागरिकांवर आक्रमणे करण्यात आली. त्यात भारतातील एका संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला. परिणामी भारतीय नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे अमेरिकेने इतर देशांत नाक खुपसण्याऐवजी स्वत:चीच देशांतर्गत स्थिती सुधारण्याकडे लक्ष देणे तिच्यासाठी हितावह आहे !