इलॉन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याच्या करारावर आणली स्थगिती !

इलॉन मस्क

न्यू यॉर्क (अमेरिका) – ट्विटरला विकत घेण्याचे घोषित केल्यावर अब्जाधीश इलॉन मस्क यांनी प्रक्रियेवर तात्कालिक स्थगिती आणली असल्याची माहिती ट्वीट करून दिली. यामागे सामाजिक माध्यमावर साधारण ५ टक्के खोटी खाती असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. अशी खाती बंद करण्याची मस्क यांची पूर्वीपासून भूमिका आहे. ट्विटरबरोबर झालेल्या कराराचा मस्क पुनर्विचार करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

मस्क यांनी केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरचे समभाग तब्बल २५ टक्क्यांनी घसरले. सध्या झालेल्या करारानुसार जर ट्विटर अथवा इलॉन मस्क हे मागे हटले, तर त्यांना दुसऱ्या पक्षाला एक बिलियन डॉलर (७ सहस्र ७४३ कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत. दोघांमध्ये ४४ बिलियन डॉलर्सचा (३ लाख ४० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) करार काही दिवसांपूर्वी झाला असून मस्क हे ट्विटरचे १०० टक्के मालक असणार आहेत, असे घोषित करण्यात आले होते.