‘मूर्तींचा भंग करवतांना आणि हिंदूंची मंदिरे पाडतांनाचे दृश्य बघतांना मला किती आनंद होतो’, असे पत्रात लिहिणारा फ्रान्सिस झेवियर म्हणे ‘गोंयचो सायब’ !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १० मे २०२२ या दिवशी आपण ‘धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

डॉ. टी.बी. कुन्हा

 ७. मूर्तिभंजक सेंट झेवियर

‘पोर्तुगालच्या दरबारी बरेच वजन असल्यामुळे फ्रान्सिस झेवियरने सगळे उपाय कार्यवाहीत आणले. गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’सुद्धा त्याच्यामुळेच घडले. १६.४.१५४६ या दिवशी त्याने राजाला लिहिलेल्या पत्रात त्याची आवश्यकता स्पष्ट केली होती. या हिंदुस्थानच्या ॲपोसलने स्वतः हिंदु धर्माविरुद्ध निर्घृण उपाय योजिले आणि नंतर ते वाढतच गेले. ८.२.१५४५ या दिवशी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेला लिहिलेल्या पत्रात तो मलबारच्या किनाऱ्यावर झालेल्या सर्रास धर्मांतराविषयी वर्णन करतो (गोव्यातल्या नव्हे, तेथे त्याने केलेच नाही.) – ‘‘बाप्टीझम् घेतल्यानंतर हे नवख्रिस्ती आपापल्या घरी जातात आणि बायका, मुले साऱ्या परिवाराला घेऊन पुन्हा येतात आणि त्यांनाही बाप्टीझम् घ्यायला लावतात. सगळ्यांचे बाप्टीझम् केल्यानंतर मी खोट्या देवांची देवळे पाडण्याचा आणि मूर्तीचे भंजन करण्याचा हुकूम देतो. ज्या मूर्तीची या लोकांनी पूजा केली, त्यांच्याकडून त्याच मूर्तींचा भंग करवतांना आणि त्यांची मंदिरे पाडतांनाचे दृश्य बघतांना मला किती आनंद होतो, याचे शब्दांनी वर्णन करता येत नाही.’’

हे होते, हिंदुस्थानच्या या संत महात्म्याचे कृत्य, त्याच्या स्वतःच्या अक्षरात नोंदवलेले. जेजुईट लोकांनी आपल्या प्रचाराकरता उपयोग करून घेण्यासाठी मूळ पत्रातील काही शब्द दडपून ठेवायलाही मागेपुढे पाहिले नाही, हे त्याच्या बनावट आणि मूळ पत्रांची तुलना केल्यास सहज सिद्ध करता येते. अशा तऱ्हेने, गोव्यात कोणतेही धर्मांतर न करता, त्याच्या अद्भुत चमत्काराच्या विलक्षण दंतकथा पसरवल्या गेल्या.’

८. सक्तीने सर्रास धर्मांतरे करणारे पाद्री

‘कितीही ऐतिहासिक विपर्यास करून सत्य लपवायचा प्रयत्न केला, तरी आज गोव्यात जे ५० टक्के कॅथॉलिक लोक आहेत, त्यांचे धर्मांतर पोर्तुगीज राजवट प्रस्थापित करण्याकरता सक्तीनेच केले गेले, हे नाकारता येत नाही. गोव्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केवळ धर्मोपदेशाने झाला नसून हिंसक दबावापोटी झाला, हे तत्कालीन नियम, कायदे आणि अनभिज्ञ अधिकाऱ्यांचे अहवाल यांवरूनच नव्हे, तर धर्मासंबंधीच्या अत्यंत खात्रीलायक नोंदीवरूनही निश्चितपणे सिद्ध होते. जेजुईट फादर फ्रानिस्क डी सौजा यांनी ‘पौर्वात्य काबिजादी’ या पुस्तकात ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यात गोव्यात धर्मांतरांसाठी अवलंबलेल्या सक्तीच्या कृतींचे विपुल पुरावे सापडतात. फादर अलेक्झांडर व्हालिग्नान यांनी आपल्या ‘ख्रिश्चन धर्मगुरूंचे आदेश’ या पुस्तकात (१५९५) स्पष्टच मान्य केले आहे – ‘‘ख्रिस्त्यांच्या धर्मगुरूंच्या कार्याचे तीन प्रमुख विभाग पाडता येतील. पहिला धर्मांतरासंबंधी, दुसरा ‘कॅटॅकिजम्’करता, तसेच त्यांनी बाप्टीझम् घ्यावा म्हणून सिद्ध करण्याकरता काय काय केले आणि तिसरा आहे नवधर्मांतरितांना दिली जाणारे साहाय्य अन् संरक्षण याविषयी. पहिल्या भागात हिंदुस्थानच्या या भागातील मूर्तीपूजकांचे धर्मांतर इतर योग्य उपायांनी झाले. बळजोरीने शिक्षा करणे, त्यांच्या मूर्तीपूजेत अडथळे आणणे, त्यांना न्याय्य रितीने सवलती नाकारणे आणि त्या धर्मांतर केलेल्यांना सन्मानपूर्वक बहाल करणे….म्हणजे इतरही धर्मांतर करतील…’’ अशा प्रकारे आपल्या लोकांचे धर्मांतर करायला पोर्तुगिजांना सक्तीचे उपाय का योजावे लागले ? ते सहज समजू शकण्यासारखे आहे. बहुतांशी शांतताप्रिय धर्माचरण करणाऱ्या हिंदूंना ते आपल्या बाजूने वळवण्याची अपेक्षा करू शकत नव्हते; कारण त्याच वेळी वर्णन करता येणार नाही, अशा त्यांच्या, अत्याचारांच्या कृतींचे प्रदर्शन हिंदूंना तिटकारा आणत होते. मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्या आणि लूटमार हेच उपाय कार्यवाहीत आणणारे विश्वबंधुत्वाचे हे दूत अन् त्यांचे दयनीय दर्शन आपल्या पूर्वजांना नव्या धर्माचे श्रेष्ठत्व पटवून देणे शक्यच नव्हते.’

(साभार – ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ (पृष्ठ क्र. ३० आणि ३१) मूळ इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)