कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील १२५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित !
कोल्हापूर, ९ मे (वार्ता.) – काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहून प्रयत्न करावे लागतील. सध्या काळ पालटत असून हिंदु धर्मासाठी अनुकूल वातावरणही निर्माण होत आहे. तरी हिंदूंनी जात, पंथ, पक्ष, संप्रदाय बाजूला ठेवून हिंदु म्हणून एकत्र यावे, असे आवाहन सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केले. ते ८ मे या दिवशी गुरुकृपा मंगल कार्यालय येथे आयोजित प्रांतीय अधिवेशनात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज पुढे म्हणाले, ‘‘काळाचे एक एक पाऊल आता पुढे पडत आहे. उत्तराखंड येथे समान नागरी कायदा झाला आहे. आपल्या मागे कार्य करतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीकृष्ण आहे त्यामुळे आपणही आता धर्मकार्य करतांना मागे हटता कामा नये. डाव्या विचारसरणीचे लोक हिंदू एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत; त्याला बळी न पडता आपण संघटन वाढवले पाहिजे. आपण सगळे देवदास, धर्मदास आहोत. इस्लामबहुल इंडोनेशियाच्या राणीच्या मुलीने हिंदु धर्म स्वीकारला असून हिंदु धर्माचे महत्त्व आता जगातील लोकांनाही पटत आहे. तरी आपणही हिंदु म्हणून आता धर्मासाठी वेळ देणे आवश्यक आहे.’’
या प्रसंगी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशनास सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचीही वंदनीय उपस्थिती होती. या अधिवेशनासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील १२५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आदर्श असून त्यांच्याप्रमाणेच आपण कृती करण्याचा प्रयत्न करूया ! संघटनेत काम करतांना आपण कार्यकर्त्यांना साधना करण्यासही प्रवृत्त करूया ! भगवान परशुराम यांच्याकडे ब्राह्म आणि क्षात्रतेज दोन्ही होते. तरी राष्ट्र आणि धर्माचे कार्य करण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री(कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ‘ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजाची आवश्यकता’, या विषयावर उद्घाटनसत्रात मार्गदर्शन करतांना बोलतांना होत्या.
विशाळगडावरील सर्व अतिक्रमण निघेपर्यंत शांत बसणार नाही ! – युवराज काटकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर
विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली असून यातील काही अतिक्रमणांना नोटिसा देण्यात आल्या; मात्र जिल्हा-तालुकास्तरावरील राजकर्त्यांच्या दबावामुळे त्यांच्यावर पुढे कारवाई करण्यात आली नाही. या गडावर अनेक घुसखोर रहात असून त्यातील काही बांगलादेशीसुद्धा असू शकतात, अशी स्थिती आहे. मी मी आंदोलन चालू केल्यानंतर माझ्याविरोधात खोट्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या; मात्र विशाळगडावरील सर्व अतिक्रमण निघेपर्यंत शांत बसणार नाही, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज काटकर यांनी केले. ते प्रथम सत्रातील गडसंवर्धनाची आवश्यकता या विषयावर बोलत होते.
राज्यातील ६० टक्के गडांवर जिहादी अतिक्रमण ! – रणजित घरपणकर, अध्यक्ष, मराठा तितुका मिळवावा प्रतिष्ठान
‘मराठा तितुका मिळवावा प्रतिष्ठान’ची स्थापना करून त्या माध्यमातून गडसंवर्धनाचे काम चालू आहे. गडांवरील तोफांचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि विशाळगड या गडांवर मोठ्या प्रमाणात इस्लामी अतिक्रमण झाले असून राज्यातील ६० टक्के गडांवर जिहादी अतिक्रमण झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून विशाळगडावरील ‘वाघजाई’ देवीच्या मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम आम्ही केले असून यापुढील काळात नृसिंह मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम पूर्ण करणार आहे. अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमण निघेपर्यंत शांत बसणार नाही !’, असे सांगितले.
‘हलाल जिहादविरोधी कृती समिती’ची स्थापना !
या अधिवेशनात ‘हलाल जिहादविरोधी कृती समिती’ची स्थापना झाली असून ही समिती प्रत्येक १५ दिवसाला ‘ऑनलाईन’ बैठक घेऊन कृती करेल, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी घोषित केले.
अन्य सत्रांतील मनोगत
१. श्री. लखन जाधव, प्रधान आचार्य, सव्यासाची गुरुकुलम्, कोल्हापूर – युद्ध शास्त्राची निर्मिती केवळ लढाईसाठी नाही, तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे. भारत देशाची भक्कम प्रगती व्हावी आणि तरुण पिढीने शस्त्र अन् शास्त्र यांचे प्रशिक्षण घेऊन युद्धकला शिकून घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने मी करतो.
२. श्री. दीपक पटेल, व्यावसायिक, ईश्वरपूर, जिल्हा सांगली – अधिवेशनस्थळी येऊन धर्मप्रेम कसे असायला हवे ? ते शिकायला मिळाले. हिंदु जनजागृती समितीने जो विडा उचलला आहे, त्याचे कार्य मी माझ्या खांद्यावर घेऊन इथून जात आहे.
सत्कार – ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांचा सत्कार सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये आणि आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे यांचा सत्कार धर्मप्रेमी सौ. अनुराधा पाटील, श्री. मनोज खाडये यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. दीपक पटेल यांनी, तर पू. श्रीमती मंदाकिनी डगवार यांचा सत्कार सौ. अरुणा पेडणकेर यांनी केला.
विशेष
१. अधिवेशनासाठी कराड येथून दिव्यांग धर्मप्रेमी श्री. राजेश चांडक (वय ५३ वर्षे), उपस्थित आहेत.
२. आपल्या मार्गदर्शनाच्या प्रारंभी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी ‘भारत माता की जय’, ‘गोमाता की जय’, यांसह अन्य घोषणा दिल्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला.
संपादकीय भूमिकागडप्रेमींनो, राज्यातील गडांवर झालेले जिहादी अतिक्रमण म्हणजेच इतिहासद्रोह खपवून घेऊ नका ! |