सूरत येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणार्‍या विद्यार्थ्यास फाशी !

शिक्षा सुनावतांना न्यायालयाकडून मनुस्मृतीतील श्‍लोकाचा उल्लेख

सूरत (गुजरात) – येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणार्‍या एका विद्यार्थ्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. फेनिल गोयाणी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षा सुनावतांना न्यायालयाने मनुस्मृतीतील श्‍लोकाचा उल्लेख करत त्याचा अर्थही सांगितला.

फेनिल याने १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी एकतर्फी प्रेमातून ग्रीष्मा वेकरिया या विद्यार्थिनीची चाकूद्वारे हत्या केली. या वेळी त्याने मुलीचा भाऊ आणि काका यांच्यावरही आक्रमण केले होते. त्यात ते घायाळ झाले होते. घटनेच्या वेळीच फेनिल याला अटक करण्यात आली होती.

पापींना दंड देणार्‍यांच्या राज्यात प्रजा उद्वीग्न नसते !

या वेळी न्यायालयाने मनुस्मृतीचा श्‍लोक नमूद करत त्याचा अर्थ सांगतांना म्हटले की, जेथे काळ्या रंगाचा आणि लाल डोळ्यांचा, तसेच पापींचा नाश करणारा ‘दंड’ कार्यरत असतो आणि जेथे शासनकर्ता योग्य अन् अयोग्य यांना जाणून दंड देतो, तेथील प्रजा कधीही उद्वीग्न आणि व्याकुळ नसते.