सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तीवंत । बाप माझा हो ज्ञानवंत ।।
वरील भजनपंक्ती प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या संदर्भात लिहिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तम शिष्य आणि सनातनच्या सर्व साधकांसाठी प्राणप्रिय असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भातही वरील पंक्ती सार्थ ठरते. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी ग्रंथांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानसरिता समाजापर्यंत पोचवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘ज्ञानवंत’ आहेत ! सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृतामुळे असंख्य जिज्ञासू साधनाभिमुख झाले असून, ८ एप्रिल २०२२ पर्यंत सनातनचे ११४ साधक संत झाले असून, १३४५ साधक संत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘यशवंत’ आहेत ! अवघ्या २७ वर्षांत, म्हणजे वर्ष १९९५ ते एप्रिल २०२२ पर्यंत ३५४ ग्रंथ-लघुग्रंथांची निर्मिती करणाऱ्या परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथ-निर्मिती क्षेत्रातील कार्य विलक्षण असून यावरूनही त्यांच्या असामान्य आध्यात्मिक कर्तृत्वाचा परिचय होतो. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘कीर्तीवंत’ आहेत !
परात्पर गुरु डॉक्टरांची ही ज्ञानगाथा, यशोगाथा आणि कीर्तीगाथा असण्यामागील मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या ग्रंथकार्याचे नानाविध पैलू ! या पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या मालिकेतील हा पहिला लेख आहे. या लेखात दिलेली सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये वाचून सनातनच्या ग्रंथांची आणि त्या योगे परात्पर गुरु डॉक्टरांची थोरवी लक्षात येईल.
२ मे २०२२ या दिवशी ग्रंथातील अध्यात्मशास्त्रीय ज्ञान आणि काळानुसार ग्रंथ-निर्मिती हे भाग पाहिले. आज पुढील भाग पाहूया.
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अध्यात्मातील जिज्ञासूंसाठी ज्ञानाचे एक आगळेवेगळे दालन निर्माण करणाऱ्या सनातनच्या ग्रंथांची अद्वितीय वैशिष्ट्ये !
४. अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे !
सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’, हे जाणून घ्यायची जिज्ञासा असते. त्यांना अध्यात्मातील एखाद्या गोष्टीमागील शास्त्र समजावून सांगितले की, त्यांचा अध्यात्मावर लवकर विश्वास बसतो आणि ते साधनेकडे वळतात. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभापासूनच प्रत्येक ग्रंथात अध्यात्मशास्त्र सांगण्यावर भर दिला आहे. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
शिवपिंडीवर बेल वहाण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे पानांचे टोक आपल्या दिशेने करून बेल वहाणे आणि दुसरी पद्धत म्हणजे पानांचे देठ आपल्या दिशेने करून बेल वहाणे. ‘दोन निरनिराळ्या पद्धती का ?’, असा प्रश्न जिज्ञासूच्या मनात येऊ शकतो. यामागील शास्त्र याप्रमाणे आहे – बेलाचे पान तारक शिवतत्त्वाचे वाहक आहे, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानांचे देठ पिंडीकडे आणि टोक स्वतःकडे करून बेलपत्र वहावे. याउलट शाक्तपंथीय (शक्तीची उपासना करणारे) शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानांचे टोक देवाकडे आणि देठ स्वतःकडे करून बेलपत्र वहावे.
५. अध्यात्मातील प्रत्येक विषयामागील मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व शोधून त्या आधारे विषय प्रतिपादन करणे
अध्यात्मातील प्रत्येक विषयामागे काही ना काहीतरी मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व असतेच. परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक विषयामागील मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व शोधून त्या आधारे विषयाचे प्रतिपादन करतात. यामुळे वाचकांना अध्यात्मशास्त्राची परिपूर्णता कळते आणि त्यामुळे त्यांची अध्यात्मशास्त्रावरील श्रद्धा आणखी वाढण्यास साहाय्य होते. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
शारीरिक आणि मानसिक विकारांच्या निर्मूलनासाठी जसे देवतांचे नामजप उपयोगी ठरतात, तसेच काही अंकजपही उपयोगी ठरतात. विशिष्ट अंकजप हा विशिष्ट देवतेच्या तत्त्वाशी साधर्म्य असणारा असतो. अंकजप केल्यामुळे त्याच्याशी निगडित असलेल्या देवतेचे तत्त्व आकर्षिले जाते. ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी ० ते ९ यांतील प्रत्येक अंकाची विविध विकारांवरील उपयुक्तता दिली आहे. प्रत्येक अंकाचा आपण नेहमी करतो, तसा उच्चार केल्याने उपाय होतात.
आता अंकजपांच्या उत्पत्तीचा विचार केल्यास असे लक्षात येते की, अंकजप हे संस्कृत भाषेतील अंकवाचक शब्दांवरून बनतात, उदा. १ या अंकाचे मूळ शब्दवाचक रूप आहे ‘एकम्’. संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाच्या मागे कार्यकारणभाव असतो, तसेच प्रत्येक शब्द त्या भावाची अनुभूती देण्यास समर्थ असतो. देववाणी संस्कृत भाषेत पुष्कळ चैतन्यही असल्याने अंकाच्या मूळ शब्दवाचक रूपाचा जप केल्यास तो अधिक परिणामकारक ठरतो. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथात अंकजप देतांना अंकांची मूळ संस्कृत रूपेही दिली आहेत.
६. अनुभवसिद्ध ज्ञानातून साकारणारे मौलिक विचारधन !
संस्कृती टिकते ती अनुभवसिद्ध वाङ्मयामुळे. हे अनुभवाचे बोेल असलेले वाङ्मय पुढील कित्येक पिढ्यांना तारक ठरते. अनुभवसिद्ध साहित्य-संस्कृती ज्यांनी जोपासली, त्यांचे नाव अजरामर झाले आणि ते दीपस्तंभ बनून या जगात मार्गदर्शक ठरले. आद्य शंकराचार्य, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्वामी आदींची चरित्रे आणि वाङ्मय यांत अनुभव ओतप्रोत भरलेला आहे. या विभूतींप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ मार्गदर्शक आहेत; कारण संतांनी विविध प्रसंगी शिकवलेले अध्यात्म, अध्यात्म जगतांना स्वतःला आलेले अनुभव, त्या अनुभवांचे केलेले विश्लेषण, प्रयोगशीलतेतून अर्जित केलेले ज्ञान इत्यादींनी ते समृद्ध आहेत. अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र असल्याने बऱ्याचदा अध्यात्मातील नाविन्यपूर्ण सूत्रे देव अनुभूती देऊन शिकवतो. या सूत्रांचाही समावेश ग्रंथांमध्ये असतो.
७. सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा
सनातनची ग्रंथसंपदा सर्वांगस्पर्शी आहे. कर्मकांडांप्रती आस्था असणाऱ्यांना धर्मशास्त्र प्रतिपादन करणारे ग्रंथ उपयुक्त ठरतात. उपासनाकांडातील साधकांना भक्तीप्रचूर करणारे ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. कलेची रुची असणाऱ्यांना ‘सात्त्विक कला कशी जोपासावी ?’, याविषयीचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शिकायला मिळतो. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसंबंधीचे ग्रंथ हिंदु समाजाला सर्वदृष्ट्या आदर्श असणारे हिंदु राष्ट्र स्थापण्याविषयी दिशादर्शन करतात. बालसंस्कार, मुलांचा विकास, आयुर्वेद असे जीवनाच्या आणि साधनेच्या प्रत्येक अंगाविषयी व्यापक आणि सखोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत.
७ अ. अद्वितीय ग्रंथ-निर्मिती : ‘सौ. उमामहेश्वरी रविचंद्रन् (आताच्या पू. [सौ.] उमामहेश्वरी रविचंद्रन्) तमिळनाडू, कु. मधुरा भोसले, कु. सर्वमंगला मेदी इत्यादी साधिकांनी भावजागृती करणारी आणि साधनेचे निरनिराळे दृष्टीकोन देणारी कृष्णचित्रे रेखाटली आहेत. कु. दीपाली मतकर (आताच्या पू. [कु.] दीपाली मतकर) यांनी समष्टीला गोपीभाव (गोपींचा कृष्णाविषयी असलेला भाव) शिकवला आणि गोपीभाव वाढवण्याविषयीच्या सूत्रांचे लिखाण केले. याविषयीची ग्रंथमालिकाही आहे. ‘असे लिखाण, चित्रे इत्यादी सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच सुचते’, असा या सर्व साधिकांचा भाव आहे.
कु. संध्या माळी आणि कु. कुशावर्ता माळी या साधिका परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मेंदी, रांगोळ्या, तसेच कपड्यांवरील कलाकृती (नक्षी) सात्त्विक बनवण्याविषयी सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करत आहेत. विविध देवतांची तत्त्वे आणि शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या आध्यात्मिक अनुभूती देणाऱ्या अनेक मेंदी आणि रांगोळ्या यांच्या कलाकृती या साधिकांनी रेखाटल्या आहेत. श्री. अशोक सारंगधर (सनातन आश्रम, रामनाथी) आणि सौ. पार्वती जनार्दन, कर्नाटक हे सनातनच्या आश्रमातील साधकांचे कपडे शिवण्याची सेवा करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना कपड्यांची शिलाई सात्त्विक होण्याच्या दृष्टीने, उदा. सदरा-पायजमा, खिडक्यांचे पडदे इत्यादी सात्त्विक दिसावेत, असे शिवण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. जान्हवी रमेश शिंदे यांच्याकडून ‘देवनागरी अक्षरे आणि अंक सात्त्विक कसे लिहावेत’, याविषयी सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करवून घेतला आणि ३१ टक्के सात्त्विकता असणारी अक्षरे अन् अंक यांची निर्मिती करवून घेतली. (कलियुगात अक्षरे किंवा अंक यांच्यात सरासरी ३० टक्के सात्त्विकता येऊ शकते.)
परात्पर गुरु डॉक्टर वरील प्रत्येक विषयाशी निगडित ज्ञान केवळ साधकांपुरतेच सीमित न ठेवता समष्टीला त्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी या प्रत्येक विषयावर ग्रंथ प्रकाशित करत आहेत. (क्रमशः उद्याच्या दैनिकात)