गोमंतकियांवर इन्क्विझिशन लादणारा फ्रान्सिस झेवियर !

ख्रिस्ती धर्माचा प्रसार गोव्यात करणे सुलभ व्हावे, म्हणून ‘इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)’ गोव्यात स्थापन केले आणि त्याद्वारे ख्रिस्ती धर्माेपदेशकांनी हिंदूंचा छळ करून धर्मांतर केले. त्यांपैकी फ्रान्सिस झेवियर हा जेझुईट धर्मोपदेशक ६ मे १५४२ या दिवशी गोव्यात पोचला. पोप पॉल तिसरा याचा प्रतिनिधी किंवा दूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली.

तिसवाडीत ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याचे काम ‘दोमिनिकानुश’ पंथाकडे, बार्देश प्रांतात ‘फ्रान्सिस्कन’ या पंथाकडे, तर सासष्टी प्रांतात ते काम करण्याचा अधिकार ‘जेझुईट’ पंथाला देण्यात आला होता. फ्रान्सिस झेवियर हा धर्मोपदेशक जेझुईट होता; पण धर्मप्रसाराचे त्याचे कार्य सासष्टी प्रांतापुरते मर्यादित नव्हते. संपूर्ण गोमंतक हे त्याने प्रारंभीचे कार्यक्षेत्र बनवले. ‘ख्रिस्ती धर्म तेवढा खरा धर्म’, असे त्याचे मत असावे. म्हणूनच ‘इतर धर्मियांना ख्रिस्ती धर्मात आणणे हे सत्कृत्य’, असे त्याला वाटत असे.

धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ आहे. अनेक दुर्दैवी स्त्रीपुरुषांना या सभेसमोर, या विकृत मनोवृत्तीच्या कोर्टासमोर खेचण्यात आले. नरकातील काल्पनिक शिक्षांपेक्षाही भयंकर, क्रूर, बीभत्स शिक्षेतूत त्यांना जावे लागले. कुणीही कुणावरही तक्रार करावी आणि मग ‘अधार्मिक’ ठरवून संशयितांना पकडून नेण्यात येई. त्यांचे अनन्वित हाल करून नंतर त्यांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळण्यात येई. राजसत्तेपेक्षा धर्मसमीक्षक सभेच्या सामर्थ्याला लोक घाबरत होते; कारण ती निरंकुश, क्रूर आणि अमानुष होती.

ख्रिस्ती धर्माचा प्रसार गोव्यात करणे सुलभ व्हावे म्हणून ‘धर्मसमीक्षण सभा’ गोव्यात स्थापन करण्याची आवश्यकता फ्रान्सिस झेवियरलाही वाटली. त्याने १६ मे १५४६ या दिवशी पोर्तुगालच्या राजाला पत्र लिहिले. त्यात तो लिहितो, ‘‘हिंदुस्थानातील रहिवासी सुधारण्याच्या दृष्टीने दुसरी आवश्यकता म्हणजे महाराजांनी पवित्र इन्क्विझिशन इकडे स्थापन करणे ही होय; कारण येथे असे पुष्कळ लोक आहेत की, जे ईश्वराविषयी पूर्ण बेपर्वाई दाखवून जगाला शरम वाटेल, अशा रितीने मोझेसचा धर्म किंवा मुसलमानी धर्म आचरतात, तसेच असे लोक पुष्कळ असून ते किल्ल्यांतून पसरलेले असल्यामुळे पवित्र इक्विझिशनची आणि पुष्कळ पाद्रींची आवश्यकता आहे.’’

कालांतराने गोमंतकात इन्क्विझिशन १५६० मध्ये स्थापन झाले आणि त्याद्वारे गोमंतकियांवर अनन्वित अत्याचार केले गेले.