संभाजीनगर येथे सभेच्या अनुमतीसाठी पोलीस आयुक्तांना भेटणार !
संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रदिनी होणाऱ्या सभेसाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे येथे २७ एप्रिल या दिवशी आगमन झाले आहे. बाळा नांदगावकर सभेच्या अनुमतीसाठी येथील पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत, तसेच ते सभा होणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचीही पहाणी करणार आहेत.
पत्रकारांशी बोलतांना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांच्या सभेला अवघे ४ दिवस शिल्लक असतांना पोलिसांनी अद्याप अनुमती दिलेली नाही. त्यामुळे ‘ही सभा होईल कि नाही ?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे; मात्र आता आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याकडे रितसर अनुमती मागणार आहोत. पोलीसही सभेला अनुमती निश्चित देतील. राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या मैदानावरच होईल. या मैदानाला वेगळा इतिहास आहे. असे असतांना दुसरीकडे सभा कशी घेणार ? राज ठाकरे यांच्या एका भाषणामुळे देशातील नेत्यांमध्ये हिंदुत्वाचा अग्नी प्रज्वलित झाला आहे. राज ठाकरे बोलायला लागले अन् नास्तिक लोक आस्तिक झाले. देवळात जाऊ लागले, तसेच आंदोलन करायला लागले. हनुमान चालिसावरून देशात अग्नी प्रज्वलित झाला आहे. आता येथील सभेनंतर आणखी पालट दिसतील.’’