पेट्रोल आणि डिझेल राज्यामुळे महागले, ही वस्तूस्थिती नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – सद्य:स्थितीत मुंबईत १ लिटर डिझेलच्या दरामध्ये २४.३८ पैसे केंद्राचा, तर २२.३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१.५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२.५५ पैसे राज्याचा कर आहे. राज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागले आहे, ही वस्तूस्थिती नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. २७ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत देशभरातील मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या विषयावर बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘राज्य सरकारमुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर चढेच राहिले आहेत’, असे वक्तव्य केले. यावर उद्धव ठाकरे यांनी याविषयीची वस्तूस्थिती स्पष्ट केली.

याविषयी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वांत अधिक म्हणजे १५ टक्के ‘जीएसटी’ महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि ‘जीएसटी’ दोन्ही कर एकत्र केले, तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही महाराष्ट्राला ‘जीएसटी’ची २६ सहस्र ५०० कोटी रुपये इतकी थकबाकी प्राप्त झालेली नाही.

महाराष्ट्रातील आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) तोकडे निकष पालटून आपत्तीग्रस्तांना साहाय्य करण्याची मागणी केंद्राकडे करत आलो आहोत; मात्र केंद्र सरकारने यावर काहीही पावले उचललेली नाहीत. या उलट चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा अधिक साहाय्य केले गेले.’’