घरामधील सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी दूरचित्रवाणी संचावर (टीव्हीवर) भुताटकीचे आणि हिंसात्मक कार्यक्रम पहाणे टाळावे !

‘धर्मप्रसाराच्या वेळी मला भारतातील ५० टक्के घरांमध्ये मध्यम ते तीव्र स्तरावरील अनिष्ट शक्तींचे त्रास आढळून आले. विदेशामध्ये तर १०० टक्के घरे भुताटकीने पछाडलेली असतात. जर वास्तू अशुद्ध असेल, तर तिचा परिणाम त्या वास्तूत रहाणाऱ्या कुटुंबाच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनावर निश्चितच होतो; म्हणून वास्तू शुद्ध आणि पवित्र राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावा.

पू. तनुजा ठाकूर

१. दूरचित्रवाणीमधून (टीव्हीमधून) निघणाऱ्या सूक्ष्म रज-तम लहरींमुळे वास्तू अशुद्ध होणे

वर्तमानकाळात वास्तूमध्ये सूक्ष्मदोष निर्माण होण्याचे मोठे कारण म्हणजे दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवर रज-तम प्रधान कार्यक्रम पहाणे ! आजकाल २४ घंटे दूरदर्शन वाहिन्यांवर कार्यक्रम दाखवले जातात. त्यांपैकी ९५ टक्के कार्यक्रम रज-तम प्रधान असतात. आजचा विवेकशून्य मनुष्य अधिकांश वेळ आपला दूरदर्शनसंच चालू ठेवतो. ‘अनेक घरांमध्ये याचे जणू काही व्यसनच लागले आहे’, अशी स्थिती मी पाहिली आहे. दिवसभरात ३-४ घंटे दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहिले नाही, तर अनेक व्यक्तींना रात्री झोपच लागत नाही. एवढेच नाही, तर घरातील बैठककक्षात कुणीच नसले, तरी दूरदर्शन संचावरील कार्यक्रम चालूच ठेवले जातात. लक्षात ठेवा, आजच्या बहुतांशी मालिका, तसेच कार्यक्रम रज-तमप्रधान असतात. त्यामुळे त्यातून निघणाऱ्या सूक्ष्म रज-तम लहरी तुमच्या वास्तूला अशुद्ध करतात.

२. भुताटकीवर आधारित कार्यक्रम पहाणे, हे अनिष्ट शक्तींना घरात निमंत्रण देण्यासारखेच !

अनेक वाहिन्यांवर भुताटकीचे चलत्चित्र (व्हिडिओ) किंवा मालिका दाखवल्या जातात. स्पर्धेच्या शर्यतीत पुढे रहाण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोचण्यासाठी ‘सामान्य व्यक्ती आवडीने पहातील’, असे सत्य घटनांवर आधारित भुताटकीचे कार्यक्रम दाखवले जातात. यातून तमोगुणी स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे असे कार्यक्रम पहाणे टाळले पाहिजे. एखाद्याला असे कार्यक्रम पहाण्याची भीती वाटत नसली, तरीही ते पाहिल्यामुळे सूक्ष्म तमोगुणी लहरींचा दष्ुप्रभाव होतोच आणि हळूहळू या लहरी त्याचे मन अन् बुद्धी यांवर सूक्ष्म त्रासदायक आवरण निर्माण करतात. त्यामुळे वास्तूमध्येही त्रासदायक शक्तीचा संचार वाढतो. परिणामस्वरूप घरात कलह, क्लेश, गर्भपात, निद्रानाश किंवा अधिक निद्रा, आळशीपणा, शारीरिक वेदना, आर्थिक हानी यांसारखे त्रास स्वाभाविकपणे होऊ लागतात. अशा प्रकारचे कार्यक्रम पहाणे म्हणजे अनिष्ट शक्तींना स्वतःच्या घरात त्रास देण्यासाठी उघडपणे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

३. कलाकार आणि चित्रपटांचे निर्माते स्वतःची अन् घराची करत असलेली हानी

अध्यात्मशास्त्राविषयी अनभिज्ञ असलेल्या आजच्या चलत्चित्राच्या (व्हिडिओच्या) जगात ही कलाकार मंडळी अशा गोष्टींवर मालिका किंवा चलत्चित्र बनवून रज-तम स्पंदने प्रसारित करतात. अशा प्रकारच्या घटनांचे चित्रीकरण करतांना त्याच्याशी संबंधितही अनेक प्रकारच्या अघटित आणि अनिष्ट घटना घडतात. नाटकात भूतबाधा झाल्याची भूमिका करतांना काही कलाकारांमध्ये खरोखर अनिष्ट शक्ती प्रवेश करतात आणि ते अनिष्ट शक्तीच्या नियंत्रणाखाली येतात. यासंदर्भात कितीतरी बातम्याही प्रसिद्ध होत असतात; परंतु कलियुगात कलाकार आणि चित्रपट निर्माते यांचा ‘येनकेन प्रकारेण धन कमावणे’, हाच मुख्य उद्देश असतो. ते जे काही करत आहेत, त्यामुळे त्यांची स्वतःची आणि समाजाची किती हानी होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी ‘थरारक नाट्य निर्माण करणे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवून धन कमावणे’, हाच मुख्य उद्देश असतो; परंतु आपण आपला विवेक जागृत ठेवून असे कार्यक्रम घरात पाहू नयेत. हा सिद्धांत हिंसात्मक चित्रपट किंवा मालिका यांच्यासाठीही लागू होतो. त्यामुळेही आपले मन आणि वास्तू दोन्ही दूषित होतात.

४. भयावह कार्यक्रम पाहिल्याने व्यक्ती आणि वास्तू यांवर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचे उदाहरण

धर्मप्रसार करत असल्यापासून ईश्वरी कृपेने वेळोवेळी सूक्ष्म जगताशी संबंधित अनेक घटनांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने मी अनुभूती घेतली आहे. त्यामुळे मला समाजात याविषयी जागृती निर्माण करण्यास अत्यंत साहाय्य झाले आहे. ‘भुताटकीचे कार्यक्रम पहाण्यामुळे वास्तूवर कोणते परिणाम होऊ शकतात ?’, याविषयी एक घटना सांगते.

मी वर्ष २००३ मध्ये बेंगळुरू येथे गेले होते. तेथे एका जवळच्या व्यक्तीला पहिली चाकरी मिळाली होती; म्हणून त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते. ‘माझी सूक्ष्म ज्ञानेंद्रिये कार्यरत आहेत’, हे त्यांना ठाऊक असल्यामुळे त्यांनी मला २-३ घरे दाखवूनच घर भाड्याने घेतले होते. मीसुद्धा त्यांना सर्व घरांपैकी जेथे सर्वांत अल्प स्तराचा त्रास होता, ते त्यांना घेण्यास सांगितले होते. ४ मासांनंतर त्या व्यक्तीचा मला दूरभाष आला. त्यांनी सांगितले की, घरात काही विचित्र घटना घडत आहेत. कार्यालयातून जेव्हा ते घरी परत येतात, तेव्हा कधी पाण्याचा नळ आपोआप चालू झालेला असतो, तर कधी शेगडी जळत असते. कधी ध्वनीप्रसारक यंत्रामध्ये (‘सीडी प्लेयर’मध्ये) असलेली ध्वनीचित्र-चकती (सी.डी.) आपोआप चालू होते आणि ते संगीत चालूच रहाते. मला प्रथम वाटले की, कदाचित् मीच सकाळी कार्यालयात जातांना हे सर्व बंद करायचे विसरून जात असेन; परंतु जेव्हा अशा घटना प्रतिदिन होऊ लागल्या, तेव्हा मी सतर्क होऊन सर्व काही बंद केल्याची निश्चिती करून जात होतो. तरीही कार्यालयातून आल्यावर दार उघडताच सर्वप्रथम मला भीती वाटायची आणि ‘जणू काही माझ्या व्यतिरिक्त येथे दुसरे कुणीतरी आहे’, असे वाटत होते. प्रत्येक दिवस काही ना काही विचित्र गोष्टी घडत आहेत; म्हणून मी आज आपल्याला हे सर्व सांगत आहे.’

हे सर्व ऐकून मला थोडेसे आश्चर्य वाटले; कारण मी ती वास्तू पाहिली होती. तिथे एवढ्या तीव्र स्तरावरील आध्यात्मिक त्रास नव्हता. मी विचारात पडले, ‘हे असे कसे घडले ?’ मी त्यांना विचारले की, मागील ३ मासांत तुम्ही त्या वास्तूमध्ये असे काहीतरी निश्चितच केले असेल, ज्यामुळे आजूबाजूची कोणती तरी अनिष्ट शक्ती तेथे आकर्षित झाली असेल. त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले, ‘‘हो. काही काळापासून मी प्रतिदिन रात्री भुताटकीची मालिका किंवा चलत्चित्र पहात आहे.’’ हे ऐकून मला सर्व परिस्थिती लक्षात आली. मी त्यांना हे सर्व करणे तात्काळ थांबवायला सांगितले आणि ती वास्तू सोडण्यास सांगितले; कारण त्या वास्तूमध्ये अनेक अनिष्ट शक्ती आल्या होत्या आणि वास्तूची शुद्धी करण्यात त्यांची साधना व्यय होत होती.

या घटनेने मला हे शिकवले की, रज-तम प्रधान कार्यक्रम पहाण्यामुळे घरात अनिष्ट शक्ती सहजपणे आकर्षित होतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे घर सात्त्विक ठेवायचे असेल, तर असे कार्यक्रम पहाणे पूर्णतः टाळा.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१७.११.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक