साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होतात ! – सद्गुरु स्वाती खाडये

डावीकडून श्री. मनोज खाडये, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु (सुश्री (कु.) स्वाती खाडये

कुडाळ, २४ एप्रिल (वार्ता.) – काळानुसार साधना समजून घेऊन केली, तर जीवन यशस्वी होईल. साधनेमुळे जीवनात आमुलाग्र पालट होतो. हे सनातनच्या ११९ संतांनी त्यांच्या जीवन प्रवासातून दाखवून दिले आहे. आताचा काळ लयाकडे चालला आहे. आता युगपरिवर्तन होऊन हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे. आज हिंदूंचे धर्मांतर होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिराच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिल या दिवशी सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य  समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान गोवा येथील धर्मप्रेमी सौ. गीता कवळेकर यांनी केला. सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. मनोज खाडये यांचा सत्कार गोवा येथील उद्योजक तथा धर्मप्रेमी श्री. प्रदीप कोरगावकर यांनी केला.

कार्यशाळेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

कायद्यात उल्लेख केलेल्या ‘डेसिबल’पेक्षा अधिक  ‘डेसिबल’ आवाजाचे भोंगे कसे वाजतात ? – मनोज खाडये

सभेत बोलताना श्री. मनोज खाडये

या वेळी हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर श्री. मनोज खाड्ये म्हणाले, ‘‘भारत स्वतंत्र झाला असला, तरी आजही भारतात ब्रिटीशकालीन कायदे कार्यरत आहेत. आपण वर्ष १८६० मधील कायदे वापरत असू, तर आपण स्वातंत्र्यात आहोत कि पारतंत्र्यात ? याचा विचार करायला हवा. ब्रिटीश आजही त्यांच्या कायद्याच्या माध्यमातून आपल्यावर अधिराज्य गाजवत आहेत. कायद्यात उल्लेख केलेल्या ‘डेसिबल’पेक्षा अधिक  ‘डेसिबल’ आवाजाचे भोंगे कसे वाजत आहेत ? घटनादुरुस्ती करून धर्मनिरपेक्ष (सेक्युलॅरिझम्) हा शब्द राज्यघटनेत समाविष्ट करतांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. या वेळी लोकसभा आणि राज्यसभा बंद असतांना ही घटनादुरुस्ती कशी झाली ? हा प्रश्‍न आहे.’’

भारतीय राज्यघटनेत पालट करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित का केले जात नाही ? – श्री. सत्यविजय नाईक

हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राचा विचार प्रत्येकापर्यंत पोचवायचा आहे. यापूर्वी अनेकांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली होती; पण आताचा समाज हिंदु राष्ट्र हा विषयच विसरत चालला आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राचा विषय पुढे आणला आहे. हिंदु राष्ट्राची संकल्पना आध्यात्मिक स्तरावर मांडली आणि त्यातूनच हे कार्य आज जोमाने चालू आहे. सत्वगुणी लोकांचे राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र ! संपूर्ण विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करणारे राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र ! आज हिंदु राष्ट्र घटनाविरोधी आणि घटनाबाह्य असल्याचे सांगून हिंदु राष्ट्राला विरोध केला जात आहे; परंतु घटनेत आतापर्यंत ११० वेळा पालट करण्यात आला. त्यात ‘सेक्युलॅरिझम्’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द समाविष्ट करण्यात आला, तर घटनेत आणखी एक पालट करून हिंदु राष्ट्र घोषित केले, तर काय फरक पडणार आहे ? हिंदु राष्ट्र हा विषय व्यापक विचार करणारा आहे. अशा हिंदु राष्ट्रासाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे.’’

क्षणचित्रे

१. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्य येथील एकूण ९० धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती.

२. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कृपाली भुवड, रत्नागिरी आणि कु. वैष्णवी मिसाळ, सिंधुदुर्ग यांनी केले.

या कार्यशाळेत उपस्थित धर्माभिमानी हिंदूंना हिंदु धर्मावर आघात झाल्यास सनदशीर मार्गाने राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या माध्यमातून निषेध कसा करायचा ? याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्यात सर्व धर्माभिमानी हिंदूंनी सहभाग दर्शवत आपापल्या क्षेत्रात तशी कृती करण्याची सिद्धता दर्शवली.