महावितरणच्या कोलगाव उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

अचानक भारनियमन केल्याच्या रागातून केले होते कृत्य

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – अचानक भारनियमन (लोडशेडिंग) केल्याच्या रागातून महावितरणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला ‘महावितरण’ असे म्हटले जाते.) सावंतवाडी शहरातील कोलगाव उपकेंद्रात काही नागरिकांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद गावडे यांच्यासह सुरक्षारक्षक चौरंग सावंत यांना मारहाण केली होती. या प्रकरणी २२ एप्रिलला अमित वेंगुर्लेकर आणि देवीदास वेंगुर्लेकर या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना २३ एप्रिलला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणातील उर्वरित संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हा प्रकार २१ एप्रिल या दिवशी मध्यरात्री कोलगाव उपकेंद्रात घडला. या प्रकरणी गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ९ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा करून कर्मचार्‍यांना मारहाण करणे, धमकी देणे आणि कामापासून परावृत्त केल्याचा आरोप ठेवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये केतन आजगावकर, अमित गवंडळकर, अरुण भिसे, मुन्ना मुद्राळे, शौकत शेख, बिद्रे, वंजारी यांच्यासह अन्य संशयितांची नावे आहेत.