अलवर (राजस्थान) येथे ३०० वर्षे जुने शिवमंदिर अनधिकृत ठरवून पाडले !

  • देवतांच्या मूर्तींची तोडफोड, तर शिवलिंग यंत्राद्वारे कापून काढले !

  • भाजपकडून काँग्रेस सरकारवर, तर काँग्रेसकडून भाजपच्या पालिकेवर मंदिर पाडल्याचा आरोप

  • शिवमंदिरासह एकूण ३ मंदिरे पाडली

अलवर (राजस्थान) – अलवर जिल्ह्यातील राजगड येथील ३०० वर्षे जुने असलेले शिवमंदिर अनधिकृत ठरवून ते पाडण्यात आले. या कारवाईत मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड झाली आहे, तसेच शिवलिंग यंत्राद्वारे कापण्यात आले. या वेळी एकूण ३ मंदिरे पाडण्यात आली. येथील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. या वेळी ८५ दुकाने आणि घरेही पाडण्यात आली आहेत. भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे, तर काँग्रेसचे आमदार जौहरी लाल मीणा यांनी ‘पालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली’, असा दावा केला आहे. ही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती, असे स्थानिकांनी सांगितले.

(म्हणे) ‘भाजपच्या ३४ नगरसेवकांना माझ्याकडे आणल्यास कारवाई थांबेल !’ – काँग्रेसचे आमदार जौहरी लाल मीणा

या पालिकेमध्ये ३५ पैकी ३४ नगरसेवक भाजपचे आहेत. याविषयी मीणा यांना स्थानिक नागरिक भेटले असता ते म्हणाले, ‘पालिकेत भाजपची सत्ता असतांना तुम्ही आमच्याकडे तक्रार कशी करता ? काँग्रेसची सत्ता असती, तर असे झाले नसते. मी तुम्हाला २४ घंट्यांची मुदत देतो. तुम्ही भाजपच्या ३४ नगरसेवकांना माझ्या घरी आणा (त्यांना काँग्रेसमध्ये आणा), तेव्हा कारवाई थांबेल. अन्यथा मी कारवाई थांबवू शकत नाही’, असे त्यांनी म्हटले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी येथील ब्रज भूमी कल्याण परिषदेने आमदार मीणा, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकारी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

‘मास्टर प्लॅन’नुसार कारवाई केल्याचा दावा

प्रशासनाचे म्हणणे आहे की, ‘मास्टर प्लॅन’नुसार राजगडमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. ते आता हटवण्यात आले आहे.

दुसरीकडे पालिका मंडळाचे अध्यक्ष प्रशासनाच्या पातळीवर ही कारवाई झाल्याचे सांगतात, तर पालिका मंडळाच्या स्तरावर ठराव संमत झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानंतरच अतिक्रमण हटवले जाते.

भाजपच्या पालिकेकडून चूक झाली ! – भाजपच्या खासदारांची स्वीकृती

या कारवाईवर भाष्य करतांना राज्यसभा खासदार आणि भाजप नेते किरोडीलाल मीणा म्हणाले की, भाजपच्या पालिकेकडून ही चूक झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, भाजपने एक पथक घटनास्थळी पाठवले असून ते ३ दिवसांत अहवाल देईल.

भाजपनेच शिफारस केली होती ! – काँग्रेसचा दावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा म्हणाले की, वर्ष २०१८ मध्ये भाजप मंडल अध्यक्षांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून हे अतिक्रमण हटवण्याची शिफारस केली होती. राजगड पालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. हे अतिक्रमण हटवण्याचा ठराव पालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला. त्यानंतरच हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. काँग्रेस सरकारमध्ये मंदिरांवर कारवाई होत नाही.

संपादकीय भूमिका

  • देहलीतील जहांगीरपुरी येथील धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यावर धावून जाणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेसच्या राज्यात हिंदूंचे जुने मंदिर पाडल्यावर गप्प का आहेत ?
  • काँग्रेसला मतदान न केल्याने ही कारवाई केली जात असेल, तर हा घटनाद्रोहच होय !