|
देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) – तालुक्यातील गिर्ये, रामेश्वर येथे आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. ३८ हेक्टर इतक्या प्रचंड भूमीवर पसरलेल्या या संशोधन केंद्रात गेल्या १० वर्षांत आंबा उत्पादनाच्या अनुषंगाने कोणतेही नवीन संशोधन झालेले नाही; मात्र या कालावधीत निवळ वेतनासाठी ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. त्यामुळे आंबा संशोधन केंद्राच्या नावाखाली एक पांढरा हत्ती पोसला जात आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या केंद्राचा अनागोंदी कारभार सुधारून याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करावेत, अन्यथा आंबा उत्पादकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
#Agriculture | #SINDHUDURG#BreakingNews | #WATCH
रामेश्वर आंबा संशोधन केंद्रात १० वर्षांत संशोधन नाही; मात्र पगारावर ५ कोटी खर्च!
दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था; सरकारने लक्ष घालण्याची शेतकर्यांची मागणी !
🔘रामेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील आंबा… pic.twitter.com/pG2In56zNI
— Surajya Abhiyan (@SurajyaCampaign) November 27, 2024
दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपिठा’च्या अंतर्गत गिर्ये, रामेश्वर येथे आंबा संशोधन उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे; मात्र या केंद्राचा सद्यःस्थितीतील कारभार सुधारावा आणि दुरवस्था दूर होऊन त्याचा जिल्ह्याची अर्थव्यवस्था सशक्त होण्यासाठी लाभ व्हावा, या अनुषंगाने देवगड येथील ‘हॉटेल वेदा’मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिवक्ता इचलकरंजीकर बोलत होते. या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम, ‘आंबा व्यापारी संघटने’चे अध्यक्ष श्री. विलास रूमडे (देवगड), आंबा उत्पादक सर्वश्री विकास दीक्षित (पडेल), रवींद्र पांडुरंग कारेकर (तोरसोळे), संजय लाड (सरपंच, बापर्डे), अजित राणे (बापर्डे), दत्तात्रय जोशी (देवगड), हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.
या वेळी अधिवक्ता इचलकरंजीकर म्हणाले
१. हे संशोधन केंद्र आंबा संशोधनासाठी निर्माण केले कि आंबा संशोधनाच्या नावाखाली शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आहे ? प्रतिवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि किडी यांमुळे उत्पादन दिवसेंदिवस अल्प होऊन आंबा उत्पादकांना फटका बसत आहे.
२. अशा वेळी दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपिठा’च्या अंतर्गत कार्य करणार्या या संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था आणि निष्क्रीयता झटकायला हवी, तसेच आंबा उत्पादकांसाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवणे, तसेच उपयुक्त संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे.
३. प्रतिवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि कीड यांमुळे उत्पादन अल्प होणे, गुणवत्ता खालावणे, तसेच आंबा उत्पादनाच्या खर्चात वाढ होणे यांसारख्या समस्या आंबा उत्पादकांना भेडसावत आहेत. त्यातच रासायनिक औषधांविषयी उत्पादकांमध्ये मोठा गोंधळ असून औषधनिर्मिती आस्थापनांकडून (कंपन्यांकडून) योग्य माहिती मिळत नसल्याने उत्पादकांना आर्थिक तोटा होत आहे.
४. गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही, असे दिसून येते. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?
५. या संशोधन केंद्रामध्ये आंब्याच्या विविध जातींवर आधारित प्रत्यक्ष संशोधन करणे, तसेच तेथे उत्पादकांसाठी लागवड, तंत्रज्ञान, रोगनिवारण आणि विपणन यांवर आधारित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र चालू करणे आवश्यक आहे.
६. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र केला जातो, तर संशोधनातून मिळणारी माहिती व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वटर, यू ट्यूब आदी सामाजिक माध्यमेे, संकेतस्थळे यांद्वारे उत्पादकांपर्यंत पोचवणे वा त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम संशोधन केंद्राने केले पाहिजे. यासमवेतच संशोधन केंद्रामध्ये आंबा उत्पादनाशी संबंधित पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा कोर्स) चालू करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञान आणि व्यावसायविषयक कौशल्य मिळेल.
उपकेंद्राविषयीची धक्कादायक माहिती
१. बागायतदारांना आणि आंबा अभ्यासक यांना लाभ होईल, असे कोणत्याही स्वरूपाचे स्थायी प्रदर्शन येथे नाही.
२. या केंद्रात गेल्या १० वर्षांत काय संशोधन केले, याची माहिती दिली नाही.
३. फिलिपाईन्स देशातील कृषी तज्ञ रॅमन बारबा यांनी लावलेला शोध स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार घडला आहे.
४. येथे अधिकारी आणि कर्मचारी अशी पदांची संख्या १५ आहे; मात्र केवळ ८ पदांची भरती केली असून त्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक आणि एक माळी यांचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे केवळ ५ जण कार्यरत आहेत.
५. केंद्रशासनाने इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चच्या माध्यमातून गोवा राज्यात २ केंद्रे चालू केली; मात्र येथेे असलेली केंद्रे निरुपयोगी ठरत आहेत.
सुराज्य अभियाना’चे प्रसिद्धीपत्रक
आंबा उत्पादकांनी समस्यांविषयी संपर्क साधण्याचे आवाहन !
आंबा उत्पादकांना याविषयी काही समस्या असतील, तर त्यांनी ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर यांना ९३०७८५५२७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. |
पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार
या पत्रकार परिषदेला संतोष कुलकर्णी (दैनिक सकाळ), हेमंत कुलकर्णी (दैनिक प्रहार), सूरज कोयंडे (दैनिक पुढारी), राजू पडवळ (दैनिक तरुण भारत), दया मांगले (दैनिक रत्नागिरी टाइम्स), अयोध्याप्रसाद गावकर (दैनिक लोकमत), गणेश आचरेकर (सिंधुदुर्ग २४ तास) आणि स्वप्निल लोके (महाराष्ट्र माझा) हे पत्रकार उपस्थित होते.