ढाका (बांगलादेश) येथे विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हिंसाचार : १०० हून अधिक घायाळ !

ढाका (बांगलादेश) – येथील डॉ. महबूर रहमान मोल्ला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ७ ते ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

२५ नोव्हेंबरला सुहरावर्दी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने चालू केली आणि नंतर हे विद्यार्थी डॉ. महबूर रहमान मोल्ला महाविद्यालयात पोचले अन् तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या या हिंसक आंदोलनामुळे महाविद्यालयाची अनुमाने ७० कोटी रुपयांची हानी झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य ओबैदुल्ला नायोन यांनी पोलीस आणि प्रशासन यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, पोलीस आणि इतर सुरक्षादलाचे सैनिक सकाळपासून घटनास्थळी उपस्थित होते; परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.