मुंबई – मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २६ नोव्हेंबर या दिवशी दूरभाष करून ‘मुख्यमंत्रीपदासाठी माझा कोणताही अडसर नाही’, असे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.
We will abide by any decision that PM Narendra Modi and the BJP leaders in Delhi take regarding the next CM of Maharashtra! – Caretaker CM Eknath Shinde #MaharashtraPolitics pic.twitter.com/MjV3U8B1jq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 28, 2024
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले,
१. ‘माझ्यामुळे सरकार स्थापन करायला अडचण आहे, हे कधी मनातही आणू नका’, असे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितले आहेे. भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे ‘मुख्यमंत्री’ म्हणून संधी दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय भाजपसाठी जसा अंतिम आहे, तसा तो आम्हालाही अंतिम आहे.
२. आम्ही दु:खी होऊन रडणारे नाही. लढून काम करणारे आहोत. महाराष्ट्रात झालेला महायुतीचा मोठा विजय ऐतिहासिक आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले. त्यामुळे हे यश मिळाले.
३. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करीन. मला काय मिळाले, यापेक्षा जनतेसाठी काय करावे ? यासाठी माझा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील जनतेला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटलो. ‘जनतेमधील मुख्यमंत्री’, अशी ओळख प्राप्त करणे, याला भाग्य लागते.
४. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझी आई आणि पत्नी यांनी काटकसर करून चालवलेले घर मी पाहिले आहे. त्यामुळे सरकार म्हणून अधिकार येतील, तेव्हा ‘सर्वसामान्यांसाठी काहीतरी केले पाहिजे’, ही माझी भावना होती. गरीब परिवारातून आल्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना मला ठाऊक आहेत. त्यामुळे अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही सर्वसामान्यांसाठी काम केले.
५. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे पूर्ण समर्थन आणि पाठिंबा आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यामध्ये आमचा कोणताही अडसर किंवा अप्रसन्नता नाही. राज्यातील बहिणींनी दिलेली ‘लाडका भाऊ’ ही ओळख मला सर्व पदांपेक्षा मोठी आहे. मुख्यमंत्री असतांना जे काम केले, त्याविषयी मी समाधानी आहे.