राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हिंदु धर्माची अपकीर्ती !
सांगली, २१ एप्रिल (वार्ता.) – कन्यादानाच्या वेळी ‘मम भार्या समर्पयामि ।’ (माझी पत्नी अर्पण करतो) असा मंत्र पुरोहित म्हणायला सांगतात, असा हिंदु धर्मात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्म आणि पुरोहित यांची अपकीर्ती केली. या वेळी ‘अन्नदान ऐकले, नेत्रदान ऐकले, ‘कन्या’ ही दान करायची गोष्ट आहे का ?, असे म्हणून हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ या श्रेष्ठ विधीला चुकीचा ठरवण्याचा अश्लाघ्य प्रकारही अमोल मिटकरी यांनी केला. (अस्तित्वात नसलेला संदर्भ देऊन जाणीवपूर्वक हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे. यातून मिटकरी यांचा हिंदुद्वेष आणि ब्राह्मणद्वेष दिसून येतो ! – संपादक) ईश्वरपूर (सांगली) येथे १९ एप्रिल या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक सभा झाली. या सभेत भाषण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदुद्रोही वक्तव्ये केली. अमोल मिटकरी असे हिंदुद्रोही वक्तव्य करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हसून त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ –
(सौजन्य : Maharashtra News 24)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकादान काय केवळ वस्तूचेच होते, हे मिटकरी यांना कुणी सांगितले ? ज्ञानदान, प्राणदान, जीवनदान, तसेच पुत्रदान केले जाते. भावी जावयाला विष्णुस्वरूप मानून मुलीचे आई-वडील मुलीला लक्ष्मीचे रूप मानून कन्यादान करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मुलगी अर्पण करत असल्याचे मुलीचे वडील वराला सांगतात. यातून ‘कन्यादान’ या हिंदु धर्मातील श्रेष्ठ विधीचे महत्त्व लक्षात येते; मात्र हिंदुद्वेषाने पछाडलेल्यांना हे कोण सांगणार ? |