रशियावरील निर्बंधांना पाठिंबा दिल्यास ते सर्बियाच्या तत्त्वांच्या विरोधात असेल !

अन्य युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध घातले असतांना आणि तसे करण्यास सर्बियावरही दबाव आणला जात असतांना त्याला विरोध करून स्वतःच्या राष्ट्रहितासाठी रशियावर निर्बंध घालण्यास विरोध करणारा सर्बिया ! छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !

बेलग्रेड (सर्बिया) – युरोपच्या पूर्व भागात असलेल्या इवल्याशा सर्बिया देशाने त्याच्या राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडवले आहे. राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आलेले अ‍ॅलेक्झँडर व्युसिक यांनी रशियावरील आर्थिक निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, ‘‘जर मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा विरोध केला, तर मला जगातील सर्वांत लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणण्यात येईल; मात्र आम्ही असे करत नसल्याने आम्हाला मोठे मूल्य मोजावे लागत आहे.’’


व्युसिक पुढे म्हणाले की

१. जर आम्ही रशियावरील निर्बंधांना पाठिंबा दिला, तर ती कृती कुणाच्याही विरोधात निर्बंध न लादण्याच्या आमच्या तत्त्वांच्या विरोधात असेल. आम्ही स्वानुभवातून हे चांगल्याप्रकारे जाणतो की, निर्बंध लादणे हे अनैतिक असून ते पुरेसेही नाही.
२. मला ‘विश्‍वासघातकी’ म्हटले जात आहे; कारण ज्या देशांनी रशियाविरोधी भूमिकेला समर्थन दिलेले नाही, असे युरोपात आम्ही एकटेच आहोत. मला काहीही म्हणा; परंतु माझ्या जनतेने मला पुन्हा निवडून देऊन मी जी निर्बंधांच्या विरोधात भूमिका घेतली, त्याच्या बाजूने कौल दिला आहे.

३. रशियावरील निर्बंधांना समर्थन देण्यासाठी माझ्यावर पुष्कळ दबाव आणण्यात आला. धमक्याही देण्यात आल्या.
४. रशियन तेल आणि नैसर्गिक वायू यांवर आम्ही प्रतिबंध लावला, तर आमची अर्थव्यवस्था कोलमडेल.