संतांनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नामजप लिहिण्याचा श्री. रजनीकांत कडू यांचा आदर्श इतर भक्तांनी घ्यावा !
अकोला – येथील श्रीरामभक्त श्री. रजनीकांत कडू यांनी कागदावर १ कोटी ६८ लाख वेळा श्रीरामाचा नामजप लिहून त्याद्वारे स्वतःची श्रीरामाप्रतीची श्रद्धा अर्पण केली आहे. कोणत्याही लालसेपोटी नव्हे, तर फक्त नामजप करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून तो गेल्या ३३ वर्षांपासून अजूनही अबाधित ठेवला आहे. ‘नामजप लिहिल्यामुळे माझी सर्व संकटे दूर झाली आहेत’, अशी वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती त्यांना आली आहे.
‘श्रीराम’ ही ३ अक्षरे कागदावर लिहिण्यास प्रारंभ !
श्री. रजनीकांत कडू हे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून निवृत्त झाले. आधीपासूनच धार्मिक असलेले श्री. रजनीकांत हे श्री कणकेश्वरदेवी आणि भागवतकार रमेशजी ओझा यांच्यासह अन्य संतांचे प्रवचन ऐकायचे. ‘श्रीरामाचे स्मरण केल्याने सर्व दु:खे दूर होतात. देवावर विश्वास ठेवल्यास सर्व कामे सहज होतात. त्यामुळे देवभक्ती आवश्यक असून देवाच्या व्यतिरिक्त कुठलाही मोह मोठा नाही’, असे ज्ञान संतांच्या प्रवचनातून त्यांना ज्ञान मिळत होते. ‘श्रीरामाचे स्मरण कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी केल्यास आत्मसमाधान अन् आत्मचिंतन होते’, असेही ते सांगतात. त्यानुसार श्री. कडू यांनी ‘श्रीराम’ ही तीन अक्षरे कागदावर लिहिण्यास प्रारंभ केला.
३ सहस्र ४२४ पानांवर १ कोटी ६८ लाख शब्दांचे लिखाण !
वर्ष १९८९ पासून त्यांनी ‘श्रीराम’ नाव हे लिहिण्यास प्रारंभ केला. श्रीराम हे नाव कागदावर लिहितांना त्या अक्षरापासून आणखी एखाद्या देवाचे नाव लिहिण्यास प्रारंभ केला. प्रतिदिन त्यांना जसा वेळ मिळेल, त्या वेळेत ते ‘श्रीराम’ हे नाव प्रतिदिन पानांवर लिहित होते. एका पानावर जवळपास ५०० ते ५४० अक्षरे ते लिहित होते. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३ सहस्र ४२४ पानांवर १ कोटी ६८ लाख वेळा फक्त श्रीरामाचेच नाव लिहिले आहे.
श्रीरामाच्या लिखाणामधून सर्व संकटे दूर होत असल्याचा भाव !
‘जेव्हापासून मी ‘श्रीराम’ लिहिण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून माझ्यावर संकट आलेले नाही. जरी संकट आले, तरी त्या संकटांचा मी लीलया सामना केला. त्यामुळे ‘श्रीराम’ या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे, हे मला समजले. ‘श्रीरामाच्या लिखाणामधून जर माझी सर्व संकटे दूर होत असतील, तर ही माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे’, असे श्री. रजनीकांत कडू यांनी सांगितले.