बीड – ‘श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट साईनगरी’, चंदननगर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा असा ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार श्रीक्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी (तालुका पाटोदा, जिल्हा बीड) येथील मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांना १५ एप्रिल या दिवशी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुणे येथील चंदननगर परिसरात श्री साई मंदिराचा वर्धापनदिन, तसेच श्रीरामनवमी उत्सव सोहळा यानिमित्त ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुढाकारातून केले होते.
महंत राधाताई महाराज सानप या अत्यंत अभ्यासू कीर्तनकार असून त्यांनी सांप्रदायिक कीर्तनांतून स्त्री भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, बालविवाह, हुंडाबंदी आणि शैक्षणिक, सामाजिक अन् इतर विषयांवर प्रबोधन करून जागृती केल्याने हा पुरस्कार दिला आहे. या प्रसंगी माजी सभापती अण्णासाहेब पठारे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र खवले, या कार्यक्रमाचे आयोजक आणि श्रीरामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.