हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

डावीकडून देहली कुस्ती संघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश पहलवान, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे , सर्वश्री श्रीकांत मिश्रा, प्रेम बाबू

देहली – हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी आहे. वाईट विचारांकडून चांगल्या विचारांकडे जाणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकडे जाणे आहे. त्यामुळे जे लोक याचा विरोध करत आहेत, ते समाजाला चांगल्या गोष्टीकडे जाण्यापासून थांबवत आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त जसोला गावकरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते मार्गदर्शन करत होते. जसोला विहार येथील दुर्गामाता मंदिराच्या बारात घर या सभागृहामध्ये ही सभा पार पडली. या सभेला सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनीही संबोधित केले. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शंखनाद करतांना श्री. राहुल श्रीवास्तव

सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की,

१. भारतामध्ये हिंदूंना असहिष्णू म्हटले जाते. जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. त्यानुसार मुसलमानांना इस्लामिक राष्ट्र मिळाले, तर हिंदूंच्या भारताला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) घोषित करण्यात आले. तरीही हिंदूच असहिष्णू कसे ? गोहत्या थांबवण्याचे कार्य करणाऱ्या गोरक्षकांची हत्या केली जाते, तरीही हिंदू असहिष्णू कसे ?

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे मार्गदर्शन करतांना

२. इस्लामिक राष्ट्रांचे ध्येय ‘विश्वाला इस्लामिक बनवणे’, हे आहे. ख्रिस्ती लोक पोपच्या आदेशानुसार ‘संपूर्ण विश्वाला ख्रिस्ती’ बनण्याचा प्रयत्न करत आहेत. विश्वामध्ये १५० हून अधिक ख्रिस्ती, ५२ इस्लामिक, १२ बौद्ध आणि ८० लाख यहुदींचे स्वतंत्र इस्रायल राष्ट्र आहे; पण संपूर्ण विश्वामध्ये १३० कोटी हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. म्हणून आपण भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

३. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जे अधिकार एका समुदायाला दिल्या जातात, ते सगळे अधिकार हिंदूंना नाकारले जात आहेत.

विदेशी हिंदु धर्माचे आचरण करत असतांना हिंदु धर्मापासून लांब जात आहेत ! – कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री मार्गदर्शन करतांना

हिंदूंनी अन्य पंथांचा सन्मान करत धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा स्वीकार केला; परंतु गेल्या ७४ वर्षांमध्ये याच धर्मनिरपेक्षतेच्या नावाने हिंदूंना त्यांचे धार्मिक शिक्षण, प्रथा, परंपरा आणि संस्कृती यांच्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्याला कुठेही धर्मशिक्षण मिळू दिले नाही. त्यामुळे हिंदु समाज त्याच्या धर्मापासून लांब गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या थांबवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अगत्याचे झाले आहे. आज हिंदूंना कपाळावर टिळा लावायला लाज वाटते, तर गळ्यात ‘टाय’ अडकवायला अभिमान वाटतो. हिंदु धर्मात दिवा विझवायची नाही, तर दिवा लावण्याची परंपरा आहे; पण ते वाढदिवस साजरा करतांना मेणबत्त्या फुंकून विझवतात. हिंदु नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करण्याऐवजी ३१ डिसेंबरला मेजवान्या करतात. अशा प्रकारे इंग्रजी पद्धतींचे आचरण करून हिंदु पाश्चात्त्यांची संस्कृती आत्मसात करत आहेत. याउलट विदेशी लोक हिंदु धर्मानुसार आचरण करत आहेत.

क्षणचित्रे

श्री. मनीष चौधरी यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे

१. या सभेला भाजपचे स्थानिक नगरसेवक श्री. मनीष चौधरी आवर्जून उपस्थित होते.

२. सभेनंतर झालेल्या बैठकीला ३० धर्मप्रेमी उपस्थित होते. सर्वांनी हिंदूंच्या संघटनासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले, तसेच प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा झाल्यानंतर धर्मशिक्षण वर्गात उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.