एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकरण
अकोला – एस्.टी. प्रशासनाद्वारे झालेली कारवाई रहित करण्याच्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून ७४ सहस्र ४०० रुपये जमा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अजय गुजर या आरोपीला संभाजीनगर येथून १५ एप्रिल या दिवशी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी प्रफुल्ल गावंडे हा पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणात अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचारी गेल्या ५ मासांपासून लढा देत होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.
२. कर्मचाऱ्यांकडून अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना अधिवक्ता म्हणून अजय गुजर यांनी नेमले. त्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबन, स्थानांतर आणि बडतर्फ अशी कारवाई केली.
३. न्यायालयीन प्रक्रियेच्या वेळी अजय गुजर यांनी राज्यातील सर्व आगारांतील कर्मचाऱ्यांना पैसे जमा करण्यासाठी भ्रमणभाष केले. अकोट आगारातील कर्मचाऱ्यांनाही ‘व्हिडिओ कॉल’वर दूरभाष केला.
४. त्याने अधिवक्ता सदावर्ते यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैशांची आवश्यकता असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये आणि निलंबित कर्मचाऱ्यांकडून ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी पैसे जमा केले. अकोट आगारातील वाहक प्रफुल्ल गावंडे यांनी अजय गुजर यांना ‘फोन पे’वरून ७४ सहस्र ४०० रुपये पाठवले.
५. विजय मालोकार यांनी ८ जानेवारी २०२२ या दिवशी अकोट शहर पोलीस ठाण्यात अजयकुमार गुजर, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि अकोट आगारमधील वाहक प्रफुल्ल गावंडे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.