मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ११ राजकीय पक्षांशी आम्ही चर्चा केली आहे. अधिकाधिक तरुणांनी मतदान करावे, यासाठी आमचा प्रयत्न असेल. दिवाळी लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीचा दिनांक घोषित करण्यात येईल, असे वक्तव्य भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात आले असून राज्यातील मतदानप्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतला. निवडणुकीविषयी अधिक माहिती देतांना राजीव कुमार म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात एकूण १९ लाख ४८ सहस्र मतदार आहेत. यामध्ये १० लाख ७७ महिला आहेत. महाराष्ट्रातील कुलाबा (४० टक्के), कल्याण (४१ टक्के), कुर्ला (४४ टक्के) आदी अल्प मतदान होणारी केंद्र असलेल्या ठिकाणी अधिक मतदान होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी राजकीय पक्षांचेही साहाय्य घेणार आहोत. राज्यातील ३५० मतदान केंद्रांवर तरुण मतदान अधिकारी असतील, तर काही मतदान केंद्रांचे दायित्व महिला अधिकार्यांकडे असेल. ८५ वर्षांहून अधिक वयाच्या मतदारांचे घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. महाराष्ट्राला ६ राज्यांच्या सीमा लागतात. या सर्व सीमांवर ३२० तपासणी नाके असणार आहेत. यामध्ये वायू, रेल्वे, जल आणि भूमी या सर्व मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. निवडणुकीत पैसा, मद्य आणि अमली पदार्थ यांचा उपयोग होऊ नये, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. निवडणुकीसाठी आयोगाकडून सक्षम ॲपचा उपयोग केला जाणार आहे. निवडणूक केंद्रावर थोडा वेळ रांगेत उभे रहावे लागेल; मात्र अधिक वेळ लागणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. एक नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे, त्याद्वारे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचे ठिकाण पहाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.’’
शहरी आणि ग्रामीण मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण !गैरप्रकाराच्या ठिकाणी ९० मिनिटांत पोचू या निवडणुकीत अधिकाधिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. शहरातील १०० टक्के, तर ग्रामीण भागात ५० टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रांचे आम्हाला थेट प्रक्षेपण पहाता येणार आहे, असे राजीव कुमार म्हणाले. कुठल्याही मतदान केंद्रावर गैरप्रकार चालू असेल, तर आम्हाला कळवण्याची सोय उपलब्ध आहे. ९० मिनिटात तिथे आमची माणसे पोचतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. |
उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेला सांगावी लागणार !
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना स्वत:ची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये ३ वेळा प्रसारित करावी लागणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, तर त्या राजकीय पक्षांना ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी का दिली ?’ याविषयीचे स्पष्टीकरण वृत्तपत्रामध्ये द्यावे लागणार आहे, असे राजीव कुमार म्हणाले.