‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !
पुणे – येथे महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या ‘गुड टच अँड बॅड टच’ (चांगला आणि वाईट स्पर्श) कार्यशाळेच्या वेळी एका मुलीने घटना सांगितली. तेव्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’विषयी उपक्रम राबवण्यात येत आहे. एका महाविद्यालयात महिला पोलीस अधिकारी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी गेले असता एका मुलीने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीसमवेत वाईट प्रकार घडत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या पीडित मुलीला विश्वासात घेत चौकशी केली, तेव्हा घटना उघडकीस आली. (मुलींना स्वरक्षण प्रशिक्षणही दिले पाहिजे. – संपादक)
पीडित मुलगी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात शिकते. ४ आरोपींपैकी २ अल्पवयीन आरोपी इयत्ता ११ वी आणि १२ वीत शिकत आहेत. मैत्रिणीसोबत घडलेली घटना ऐकून शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. मुलीच्या पालकांनी तक्रार प्रविष्ट केली. पीडितेने सांगितले की, ४ मुलांनी तिच्याशी गैरवर्तन केले. सामाजिक माध्यमांवर आरोपींशी ओळख झाली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.