हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायबाग येथील दत्त मंदिरात विशेष प्रवचन
रायबाग, १६ एप्रिल (वार्ता.) – सध्या हिंदू बांधव शारीरिक, मानसिक, वैचारिक स्तरावर धर्मकार्यात सहभागी होतात. शारीरिकदृष्ट्या संघटना करणे, सभा घेण्याचा प्रयत्न उत्तमरितीने करतात; परंतु त्यासह हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी आपल्यात ब्राह्मतेज जागृत होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने या धर्मकार्यात शारीरिकरित्या सहभागी होण्यासह आपली कुलदेवता आणि भगवान श्रीकृष्ण यांचा नामजप नियमितपणे केला पाहिजे. तरी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी आणि ब्राह्मतेजाच्या जागृतीसाठी साधनेला प्रारंभ करा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. येथील दत्त मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विविध भागांतून आलेले धर्मप्रेमी उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘सध्या राज्यात हिजाब, हलाल, देवस्थानात इतर धर्मीय करत असलेला व्यापार, मशिदींवरील ध्वनीक्षेपक यांसह अनेक विषय चर्चेत आहेत. या सर्व विषयांच्या संदर्भात समितीही कायदेशीर लढा देत आहे. त्या लढ्यात यशही मिळत आहे. हे सर्व केवळ भगवंताच्या कृपेनेच साध्य होत आहे. धर्मकार्य करतांना संतांचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. संत त्रिकालज्ञानी असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन धर्मकार्य केल्यास त्या कार्यात यश प्राप्त होऊन वैयक्तिक साधनाही होते.’’