|
शेतकऱ्यांचा संताप अनावर होण्यापूर्वीच वीज वितरण आस्थापनाने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत ! -संपादक
भंडारा – गर्भात असलेल्या धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता असतांना वीज वितरण आस्थापनाच्या वतीने कृषी पंपाचे भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी रखरखते ऊन आणि पाण्याअभावी धानासह अन्य पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पवनी तालुक्यातील आसगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रात १३ एप्रिल या दिवशी दुपारी प्रवेश केला, तसेच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी अनुमाने १५० शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद केला आहे.
आसगाव येथे महावितरणचे ३३/११ केव्हीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावरून परिसरात गावांमध्ये वीजपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण आस्थापनाच्या वतीने अतिरिक्त भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे अगोदरच निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला. सध्या कडक उन्हाळा चालू असल्याने पाण्याअभावी गर्भात असलेले धान पीक आणि पालेभाज्या करपत आहेत. त्यामुळे मरणासन्न अवस्थेतील पिके वाचवण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे.