आज चैत्र पौर्णिमा (१६.४.२०२२) या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने…
१. गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन देवस्थान !
१ अ. श्रीराम पंचायतन देवस्थानात स्वतःच्या हृदयात श्रीरामाचे स्थान असणारी हनुमंताची उभी मूर्ती असणे : गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन देवस्थानात हनुमंताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी भर राजसभेत हनुमंताने आपल्या हृदयातील श्रीरामाचे दर्शन घडवून त्याच्यातील परमोच्च दास्यभक्तीचे रहस्य उलगडून दाखवले होते. भक्तांच्या हृदयात कोरणारा हा प्रसंग या देवस्थानातील मारुतीच्या मूर्तीतून दिसतो.
मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनारूढ श्रीराम आणि सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात, म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर लगेच हनुमंताची घुमटी (देवळी) आहे. या घुमटीत हनुमंताची उभी आणि हृदयात श्रीरामाचे स्थान दाखवणारी मूर्ती आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून त्या हनुमंताची दृष्टी मंदिरातील श्रीरामरायांच्या चरणांवर स्थिरावली आहे.
२. श्रीराम पंचायतन मंदिराच्या जीर्णाेद्धारानंतर हनुमंताच्या मूर्तीवर होत असलेला किरणोत्सव !
२ अ. वर्ष १९७२ मध्ये संकेश्वर मठाधीश जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते श्रीराम मंदिराची उभारणी होणे : प.प. भगवान श्रीधरस्वामींच्या आशीर्वादाने वर्ष १९७२ मध्ये संकेश्वर मठाधीश जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते या श्रीराम पंचायतन देवस्थानाची उभारणी झाली. हे श्रीराम मंदिर लहान होते. त्यामुळे मारुतिरायांच्या घुमटीसह प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीमाता यांच्या समाधीही बाहेरच्या बाजूला होत्या.
२ आ. श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यावर मारुतिरायांच्या घुमटीचा समावेश मुख्य मंदिराच्या सभागृहात होणे, तेव्हापासून हनुमान जयंतीला हनुमंताच्या मूर्तीवर ‘किरणोत्सव’ होण्यास आरंभ होणे : वर्ष २०१५ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यावर प.पू. भगवानदास महाराज, प.पू. रुक्मिणीमाता आणि हनुमंत या सर्वांच्या घुमट्या मंदिराच्या सभामंडपात आल्या. मध्यंतरीची ४३ वर्षे मारुतिरायांची घुमटी मंदिराच्या बाहेरच होती. हनुमंताच्या घुमटीचा समावेश सभामंडपात झाल्यापासून हनुमंताच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडत नव्हता; पण त्याच वर्षी हनुमान जयंतीला हनुमंताच्या मूर्तीवर ‘किरणोत्सव’ आरंभ झाल्याचे माझ्या लक्षात आले.
३. कुठल्याही मंदिरात होणारा किरणोत्सव ही केवळ दैवी कृपाच असणे
३ अ. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात कार्तिक आणि माघ या मासांत किरणोत्सव होत असणे आणि या मंदिराच्या स्थापत्य अभियंत्याला अशी प्रतिभा केवळ दैवी कृपेमुळे लाभलेली असणे : कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात कार्तिक मासात, म्हणजेच ९, १०, ११ नोव्हेंबर आणि माघ मासात ३१ जानेवारी अन् १, २ फेब्रुवारी या ठराविक ६ दिवसांत किरणोत्सव होतो. मंदिर स्थापत्यशैलीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते ‘हे मंदिर ज्या अज्ञात अभियंत्याने बांधले आहे, त्याचा पर्यावरणीय पालटाचा अचूक अभ्यास होता. पर्यावरणीय पालट लक्षात घेऊनच त्याने मंदिराची रचना केली आहे.’ मला असे वाटते की, हा केवळ या संशोधकांच्या बुद्धीचा तर्क आहे. यामध्ये ‘तथ्य किती आहे ?’, हे त्या जगदंबेलाच ठाऊक; कारण अशी प्रतिभा केवळ दैवी कृपेनेच लाभू शकते.
३ आ. गौतमारण्य आश्रमातील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या जन्ममुहूर्तावर उगवत्या सूर्यनारायणाचे किरण हनुमंताच्या मूर्तीवर पडून किरणोत्सव अनुभवता येणे : या प्रतिभेची प्रचीती मला श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर आली. या मंदिराचा जीर्णोद्धार करतांना पर्यावरणीय पालटाचा कुठलाही अभ्यास करण्यात आला नव्हता, तरीही केवळ हनुमान जयंतीच्या दिवशी आणि तेही हनुमंताच्या जन्ममुहूर्तावर उगवत्या सूर्यनारायणाची तांबूस रंगाची किरणे हनुमंताच्या मूर्तीवर पडत आहेत. यामुळे ‘मंदिरात जणू शेंदुराची उधळण होत आहे’, असे मला वाटते आणि ही घटना केवळ वर्षातून एकदाच घडते.
४. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आणि प.पू. दास महाराज यांच्या पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम मंदिरात हनुमंताच्या मूर्तीवर होणारा किरणोत्सव यांतील मुख्य भेद !
४ अ. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडणारे सूर्याचे किरण हे मावळत्या सूर्याचे असणे, तर गौतमारण्य आश्रमाच्या मंदिरातील मारुतिरायांच्या मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण हे उगवत्या सूर्यनारायणाचे असणे : कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण हे मावळत्या सूर्याचे किरण आहेत. ते महालक्ष्मीच्या चरणांपासून मुखमंडलावर आले की, अदृश्य होतात. पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील मारुतिरायांच्या मूर्तीवर पडणारे किरण उगवत्या सूर्यनारायणाचे आहेत. ते प्रथम हनुमंताच्या मुखमंडलावर पडतात आणि नंतर हळूहळू चरणांकडे जातात. श्रीमन् नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आशीर्वादाने श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतरच ही दैवदुर्लभ घटना घडू लागली आहे.
५. वर्ष २०२१ च्या हनुमान जयंतीचा उत्सव !
५ अ. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व साधक मंदिरात मूर्तीवर दिसणाऱ्या सूर्यकिरणाची आतुरतेने वाट पहात असणे : केवळ हनुमान जयंतीच्या दिवशी दिसणारे हे दुर्मिळ दृश्य पहाण्यासाठी काही ठराविक साधक मंदिरात उपस्थित रहातात. त्या दिवशी मोठा उत्सव केला जात नाही; कारण त्या दिवशी बांदा शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. २७.४.२०२१ या दिवशी चैत्र पौर्णिमा, म्हणजे हनुमान जयंती होती आणि योगायोगाने त्या दिवशी मंगळवार होता. मारुतिरायांचा जन्म मंगळवारीच झाला आहे. ठराविक साधक मंडळी नेहमीप्रमाणे या सोहळा पहाण्यासाठी जमली होती. जन्ममुहूर्त झाला; पण नेहमीप्रमाणे मूर्तीवर सूर्यकिरण दिसले नाही. आम्ही सर्व जण त्या दुर्लभ क्षणाची आतुरतेने वाट पहात होतो.
५ आ. प.पू. दास महाराज यांनी मारुतिराया आणि सूर्यनारायण यांना प्रार्थना केल्याक्षणी सूर्यकिरण मारुतिराया अन् प.पू. दास महाराज यांच्या आज्ञाचक्रावर पडणे : सूर्यकिरण दिसत नसल्याचे पाहून सर्वांची मने कासावीस झाली. तेव्हा माझ्याकडून मारुतिराया आणि सूर्यनारायण यांना प्रार्थना झाली, ‘हे मारुतिराया, सूर्यवंशी श्रीराम आपले आराध्य आहेत, तसेच सूर्यनारायण तुमचे आद्यगुरु आहेत. जन्मतःच आपण फळ समजून त्यांच्या दिशेने झेप घेण्याची लीला केली होती. वर्ष २०१५ पासून आपण आम्हाला सूर्यनारायणाशी असलेल्या आपल्या गुरु-शिष्य नात्याला उजाळा देणारी घटना दाखवत आहात. हे सूर्यनारायणा, आज आपण का बरे उशीर करत आहात ? सर्व साधक या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहेत. आपल्या चरणी प्रार्थना आहे, ‘आपण आणखी विलंब करू नये’, अशी प्रार्थना करून मी पूर्वेकडे तोंड वळवले. तत्क्षणी सूर्यकिरण मारुतिराया आणि माझे आज्ञाचक्र यांवर एकाच वेळी पडले. तेव्हा मी कृतज्ञता व्यक्त केली.
६. ‘आज्ञापालन’ हा शिष्यातील गुणांचा राजा आहे’, असे समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले असणे अन् आज्ञाचक्रावर पडलेल्या किरणांत हेच रहस्य दडलेले असणे
समर्थांनी दासबोध या ग्रंथात उत्तम शिष्याची लक्षणे सांगितली आहेत. ‘गुरुकृपायोग’ निर्माण करतांना श्रीमन् नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) ‘शिष्य’ या ग्रंथामध्ये शिष्याची लक्षणे दिली आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये ‘आज्ञापालन’ हा शिष्यातील गुणांचा राजा आहे’, असे सांगितले आहे. त्रेतायुगात दास्यभक्ती करतांना ‘शिष्य कसा असावा ?’, हे मारुतिरायांनी त्यांच्या कृतीतून दाखवले.
सूर्यदेवाने गुरुदक्षिणा म्हणून सुग्रीवाचे रक्षण करण्याचे वचन शिष्य हनुमंताकडे मागितले. हनुमंताने शेवटपर्यंत ते वचन पाळले. जीवनभर मारुतिराया श्रीरामरायांच्या आज्ञेतच राहिले. रामावतार संपवून श्रीविष्णु वैकुंठाला निघाले. तेव्हा त्यांनी मारुतिरायांना सूर्य-चंद्र असेपर्यंत साधकांचे रक्षण करण्याची आज्ञा केली. आजही मारुतिराया त्या आज्ञेचे पालन करत आहे. किरणोत्सवाच्या वेळी आज्ञाचक्रावर पडणाऱ्या किरणांमध्ये हेच रहस्य दडले आहे.
जगी धन्य तो मारुति ब्रह्मचारी ।
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ।
नमू जावया लागी रे मोक्षपंथा ।
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ।।
अर्थ : समस्त तपस्वींमध्ये श्रेष्ठ, ब्रह्मचारी, सर्व विकारांपासून मुक्त असलेले मारुतिराया या जगात धन्य होत ! त्यांची उपासना करणारा मनुष्य मोक्षमार्गाला लागतो. अशा हनुमंताला माझा नमस्कार असो.
– आपला चरणसेवक,
प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२२)
७. उपस्थित साधकांना आलेली अनुभूती
७ अ. प.पू. दास महाराज यांच्यातील दास्यभक्तीमुळे किरणोत्सव अनुभवता येणे : ‘वर्ष २०२१ मधील हनुमान जयंतीच्या दिवशी सूर्योदयानंतर प.पू. बाबांच्या (प.पू. दास महाराज यांच्या) आज्ञाचक्रावर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे मंदिरात तेजस्वी शेंदरी रंगाची छटा दिसत होती. त्याच वेळी मारुतिरायांच्या आज्ञाचक्रावर निर्गुण शुभ्र किरण पसरले होते. या अत्यंत दुर्मिळ योगाचे साक्षीदार होण्याची संधी उपस्थित साधकांना लाभली. परात्पर गुरुदेव म्हणतात, ‘प.पू. दास महाराज यांच्यामध्ये मारुतिरायांची दास्यभक्ती अनुभवता येते.’ हा किरणोत्सव केवळ प.पू. दास महाराज यांच्यातील दास्यभक्तीमुळेच साधकांना अनुभवता आला. यासाठी परात्पर गुरुदेव, प.पू. दास महाराज, हनुमंत आणि सूर्यनारायण यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्री. संतोष आनंदा गरुड, पर्वरी, गोवा. (१.३.२०२२)
गौतमारण्य आश्रमात साधकांना मारुतिरायांचे अस्तित्व जाणवणेश्री नारायणाच्या धर्मकार्याची पूर्तता परम भक्त हनुमंताविना पूर्ण होत नसल्याने नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही धर्मकार्य करतांना मारुतीला आवाहन करणे, तसेच त्यांनी गौतमारण्य येथील श्रीराम मंदिराच्या कळसाचे पूजन केल्यामुळे तिथे मारुतिरायांचे अस्तित्व जाणवणे ‘हनुमंत ही देवता चिरंजीव आहे. श्रीमन् नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) धर्मकार्याची पूर्तता भक्तशिरोमणी हनुमंताविना पूर्ण होत नाही. आताच्या काळातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात रामनाथी आश्रमात विराजमान असलेल्या श्रीमन् नारायणाने अनिष्ट शक्तींच्या विरोधातील लढ्याचा आरंभ मारुतिरायांना आवाहन करूनच केला आहे. त्यासाठी त्यांनी ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. रामनाथी आश्रमावर मारुतिरायांचे चित्र असलेली धर्मपताका स्थापन केली आणि गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरावरील कळसाचे पूजन केले. त्यामुळे साधकांना गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरात मारुतिरायांचे अस्तित्व जाणवते.’ – आपला चरणसेवक, प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |