वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

  • असे संपूर्ण देशभरात झाले पाहिजे, तरच अयोग्य गोष्टीला पायबंद बसेल ! – संपादक
  • सर्वोच्च न्यायालयाचा काही वर्षांपूर्वीचा आदेश असतांनाही सरकार, प्रशासन आणि पोलीस हे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे आता हिंदू याला वैध मार्गानेच विरोध करत असतील, तर ते चुकीचे कसे ? – संपादक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ‘श्रीकाशी विश्‍वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात आहे. घराच्या छतांवरही ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत.

वाराणसीच्या साकेत नगर परिसरात आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी त्यांच्या घरापासून या आंदोलनाला प्रारंभ केला आहे. ते म्हणाले की, जेव्हा अजान चालू होईल, तेव्हा अशा प्रकारे ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण केले जाईल. याद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न नाही. काशीमध्ये पहाटेही मंदिरात वैदिक पाठ आणि पूजाअर्चा, हनुमान चालीसाचे पठण केले जात होते; मात्र दबावामुळे हे सर्व आता बंद झाले आहे. ध्वनीप्रदूषणाचे कारण देत मंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवण्यात आले; मात्र मशिदींवरील ध्वनीक्षेपक अद्याप हटवण्यात आलेले नाहीत. पहाटे ४.३० वाजल्यापासूनच अजान चालू होते. अजानचा आवाज येताच आम्ही मंदिरातून वैदिक मंत्र आणि हनुमान चालीसा यांचे पठण ध्वनीक्षेपकावर करत आहोत. अजानच्या आवाजाला आम्ही कित्येकदा आक्षेप घेतला होता. अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकाचा आवाज अल्प करावा जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही, अशी तक्रार अनेकदा केली होती. (तक्रार करूनही प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर जनतेने स्वतःहून प्रत्युत्तर देण्यास चालू केले, तर चुकीचे कसे ? – संपादक)