सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा आज १४.४.२०२२ या दिवशी ‘ऐंद्री शांतीविधी सोहळा’ आहे. त्या निमित्ताने …
१. पू. होनपकाकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची मानस पाद्यपूजा करण्याचा विचार येऊन तशी कृती होणे
‘चैत्र शुक्ल तृतीया (४.४.२०२२) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा ७४ वा वाढदिवस होता. त्या दिवशी पू. काका नेहमीप्रमाणे साधकांसाठी नामजप करायला बसले होते. त्या वेळी ‘आज पू. काकांचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांचे मानस पाद्यपूजन करूया’, असा विचार माझ्या मनात आला. पू. काकांची मानस पाद्यपूजा करतांना मी त्यांचे चरण चांदीच्या ताटात ठेवले आणि गुलाबजलाने त्यांचे प्रक्षालन केले. नंतर मी त्यांच्या चरणांना पंचामृत लावले आणि शुद्ध उदकाने हळुवारपणे त्यांचे चरण धुतले. नंतर मी त्यांचे चरण मऊ वस्त्राने पुसले आणि त्यांना गंध, अक्षता अन् विविध प्रकारची फुले वाहिली. त्यानंतर मी पू. काकांना कुंकुमतिलक लावून त्यांना शुद्ध तुपाच्या निरांजनाने ओवाळले. त्या वेळी माझे मन निर्विचार होते. मी शरणागतभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर शांत चित्ताने त्यांच्यासमोर नामजपाला बसले.
२. पू. काकांच्या देहाभोवती तेजोवलय दिसणे आणि ‘त्यांच्या देहातून विविध प्रकारचे सुगंध दरवळत असून वाऱ्याची झुळूक ते सुगंध साधकांपर्यंत पोचवत आहे’, असे जाणवणे
नंतर पू. काकांकडे पहात असतांना मला त्यांच्यामागे अडीच ते ३ फूट व्यासाचे तेजोवलय दिसले. त्यात मला गुलाबी, पिवळा आणि पोपटी हे रंग स्पष्ट दिसले. ‘वलयाच्या भोवती असलेल्या सोनेरी रंगाच्या कडेतून तेजस्वी प्रकाशकिरण प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. त्यांचा पूर्ण देह श्री गुरूंच्या तत्त्वाने आणि ईश्वरी चैतन्याने भारित झालेला असून त्यातून विविध प्रकारचे सुगंध दरवळत होते. त्यांच्याकडून येणारी वाऱ्याची झुळूक ते सुगंध नामजपाला बसलेल्या साधकांपर्यंत पोचवत होती. ती झुळूक लहान बालिकेचे रूप घेऊन उड्या मारत हर्षाेल्हासाने खोड्या करत फिरत असल्याचे मला जाणवले.
‘पू. काकांची केलेली मानसपूजा, त्यांच्याभोवतीचे अतिशय प्रकाशमान तेजोवलय, दरवळणारा सुगंध आणि सर्वांमध्ये बागडणारी ती ६ – ७ वर्षांची सुंदर बालिका (झुळूक), हे सर्वकाही सतत अनुभवतच रहावे, डोळे उघडूच नये’, असे मला सतत २० मिनिटे जाणवत होते.
३. पू. काकांच्या वाढदिवसाच्या वेळी जमलेल्या संतांमुळे तेथे जनलोकाचे वातावरण निर्माण झाल्याची अनुभूती येणे
पू. काकांचा नामजप पूर्ण झाल्यावर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे), सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाईआजोबा (वय ८० वर्षे), सनातनच्या ५२ व्या पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी (वय ७५ वर्षे) आणि सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी हे उपस्थित होते. ‘पू. काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेल्या संतांमुळे तेथे जनलोकाचे वातावरण निर्माण झाले’, अशी अनुभूती मला आली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.
या अनुभूतीसाठी श्रीकृष्ण, परात्पर गुरुदेव, पू. होनपकाका आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. विमल पुंडलिक माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |