‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !

सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात६४ वी ‘राज्य अजिंक्यपद’ आणि मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा झाल्या. ‘राज्य कुस्तीगीर परिषदे’च्या मान्यतेने आणि ‘सातारा जिल्हा तालीम संघा’च्या वतीने या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. राज्यभरातून ९०० हून अधिक मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर येथील पृथ्वीराज पाटील यांनी ही लढत जिंकली.

आतापर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या मल्लाला चांदीची गदा, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख देण्यात येत होते; मात्र सातारा येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला केवळ गदा आणि मानपत्र देण्यात आले. यामुळे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्या मनातील खंत माध्यमांजवळ बोलून दाखवली. याविषयी स्पर्धेचे संयोजक दीपक पवार म्हणाले, ‘‘स्पर्धेचे यजमानपद घेतांना महाराष्ट्र केसरी होणार त्यांना संयोजक म्हणून आम्ही रक्कम देण्याचे ठरले नव्हते, तसेच आम्ही ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’स २१ लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत. स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय केला असून केवळ ५१ सहस्र रुपये देण्यास आम्हाला काहीच अडचण नव्हती.’’ दुसरीकडे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी ‘महाराष्ट्र केसरी कुस्तीचे संपूर्ण आयोजन सातारा जिल्हा तालीम संघाकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी धनादेशाद्वारे दिलेली रक्कमही पंचांचे मानधन आणि अन्य गोष्टींसाठी उपयोगात आणली गेली आहे; मात्र बक्षिसासाठी म्हणून कोणताही निधी किंवा धनादेश परिषदेकडे दिलेला नव्हता’, हे स्पष्ट केले आहे.

कोणताही मल्ल कुस्ती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत एकदा तरी ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याची इच्छा बाळगतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रक्ताचे पाणी करत असतो. अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ? याविषयी ‘सातारा जिल्हा तालीम संघ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद’ यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान झाला, तरच भविष्यात महाराष्ट्राच्या मातीत ‘नरकेसरी’ निर्माण होतील, हे निश्चित !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा