‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणार्‍या जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू करण्यात आलेली ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ ही जिज्ञासूंसाठी बोधामृत ठरली आहे. प्रतिदिन नामजप, सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद प्रसारित करण्यात येतात. याविषयी मुंबई, नवी मुंबई आणि डोंबिवली (ठाणे) येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

१. सौ. मानसी दाते, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक, सानपाडा, मुंबई.

१ अ. कोरोनामुळे दळणवळण बंदी चालू झाल्यावर ‘साधना आणि अग्निहोत्राच्या प्रसार यावर बंदी आली आहे’, असे वाटून मन दुःखी होणे अन् त्यानंतर सनातनच्या साधिकेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू होत असल्याचे सांगणे : ‘दळणवळण बंदी चालू झाल्यावर मी पुष्कळ दुःखी झाले. ‘आपली साधना आणि अग्निहोत्राचा प्रचार यांवरच दळणवळण बंदी लागू झाली आहे. आता मी केवळ सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र करू शकते’, असे मला वाटले. त्या वेळी सनातन संस्थेच्या साधिका दीपा जैत यांचा मला भ्रमणभाष आला आणि त्यांनी सांगितले, ‘‘दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेकडून ‘ऑनलाईन’ सत्संग चालू होत आहेत आणि मी आपल्याला त्या सत्संगाची ‘लिंक’ पाठवत आहे.’’

१ आ. ‘विविध प्रकारचे ‘ऑनलाईन’ सत्संग देऊन श्री गुरूंनी जणू सत्संगरूपी पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिले आहे’, असे वाटणे : दीपा जैत यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमती गिरमकरताई आणि दीपा मला नियमितपणे सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगाची ‘लिंक’ पाठवत होत्या. मी त्यांना धन्यवाद देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. ‘भगवान देता है, तो छप्पर फाडके देता है’ या हिंदीतील म्हणीप्रमाणे मला सद्गुरूंच्या कृपेची प्रचीती आली. ‘सनातनने ‘धर्मसंवाद’, ‘नामजप सत्संग’, ‘बालसंस्कार’ आणि ‘भाववृद्धी सत्संग’, अशा सत्संगांची रेलचेल करून दिल्यावर ‘सद्गुरूंनी सत्संगरूपी पंचपक्वानांचे ताटच वाढून दिले आहे’, असे मला वाटले.

१ इ. भाववृद्धी सत्संगांमुळे मन भावविभोर होणे : भाववृद्धी सत्संगाला १०० दिवस पूर्ण झाले. ‘हे १०० दिवस कसे गेले ?’, हे मला समजलेही नाही. सौ. क्षिप्राताई भाववृद्धी सत्संग घेतात. तेव्हा माझे मन भावविभोर होते. त्या जो प्रसंग सांगतात, तो मन आणि डोळे यांच्यासमोर हुबेहूब उभा रहातो अन् आम्ही त्या भक्तीरसात डुंबून जातो. एवढे त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य आणि सामर्थ्य आहे. ‘आपणा सर्वांना अशीच अनुभूती येत असेल’, असा मला विश्वास आहे. ‘हा सत्संग असाच अखंड चालू राहू दे’, अशी माझी प्रार्थना आहे. कोटीशः कृतज्ञता आणि धन्यवाद !

१ ई. कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्काळातही सनातनने उपलब्ध करून दिलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगांमुळे आनंद मिळणे

१. सनातनच्या परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने या आपत्काळातही आम्हाला सत्संग ऐकायला मिळत आहेत. या सत्संगांमुळे पुष्कळ छान वाटून माझ्या मनाला आनंद आणि शांती मिळते.

२. ‘शरणागतीचे महत्त्व’ या विषयावरील सत्संग ऐकल्यावर माझे मन आनंदाने भरून आले. मी नेहमी प्रार्थना करतच असते. ‘देवाच्या कृपेविना कुठलीही गोष्ट (परमार्थ सेवा) करता येत नाही’, यावर माझा दृढ विश्वास आहे; पण हा भाववृद्धी सत्संग ऐकल्यावर तो आणखी दृढ झाला. मला अशा अनुभूती येतच असतात.

३. कितीही अडचणी आल्या, तरी परमेश्वराच्या कृपेमुळे आपल्याला आशेचा एक किरण दिसतो. आम्हाला अनेक अडचणी येतात; पण मार्गातील अडथळे दूर होऊन आम्हाला हा सत्संग ऐकण्याची संधी मिळते.

४. नामसत्संगात सद्गुरु जाधवकाका सांगतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून मन एकाग्र केल्यावर प.पू. आठवले महाराज कृष्णाच्या रूपात दिसतात आणि ‘सत्संगातील श्रीकृष्णाचे चित्र हे श्रीकृष्णाच्या रूपातील त्यांचे तरुणपणातील छायाचित्र आहे’, असे मला वाटते.

‘अशीच आमच्यावर प.पू. श्री तात्यांची कृपा राहू दे. हे संपूर्ण जग सत्संगाच्या मार्गावर चालून धर्माचा उदय होऊ दे’, हीच प.पू. तात्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’ (सद्गुरु श्री तात्या महाराज नरगुणकर हे सौ. मानसी दाते यांचे गुरु आहेत.) (१३.६.२०२०)

२. सौ. आरोंदेकर (मराठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदार, ऐरोली)

‘सत्संग ऐकल्यावर मी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ याविषयीच्या ग्रंथाची मागणी केली. मला सत्सेवा करण्याची प्रेरणा मिळाल्यामुळे मी सेवा शिकून घेणार आहे. मी आपले उपकार कधीच विसरणार नाही.’ (हे सांगत असतांना ‘सौ. आरोंदेकर यांचा भाव जागृत झाला’, असे जाणवले. – संकलक) (२६.५.२०२०)

३. सौ. मेघना राय (घाटकोपर)

‘मी प्रतिदिन देवाची पूजा करते आणि सकाळी अन् सायंकाळी देवासमोर दिवा लावते; परंतु देवासमोर दिवा लावण्याचे महत्त्व मला ठाऊक नव्हते. ‘देवाची पूजा करतांना दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे ?’, हे मला या सत्संगात समजले.’ (६.६.२०२०)

४. सौ. साक्षी गोठीवरेकर (वाचक, भांडुप)

‘मी पुष्कळ दिवसांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकत आहे. मी बालसंस्कार वर्ग आणि भाववृद्धी सत्संग यांमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करायला आरंभही केला आहे. आम्ही घरातील सर्वांचे वाढदिवस दिनांकाप्रमाणे साजरे करत होतो; पण सत्संगात ऐकल्याप्रमाणे आता मी सर्वांच्या पत्रिकेतील तिथी लिहून ठेवल्या. या वेळी मी माझ्या मुलाचा आणि मुलीचा वाढदिवस तिथीप्रमाणे साजरा केला. तेव्हा माझ्या मनाला आनंद मिळाला. आता मी धार्मिक कृती सत्संगात सांगितल्यानुसार करते. माझ्या मनात काही प्रश्न होते. सत्संगात मला त्यांची उत्तरे मिळाली. शास्त्राप्रमाणे कृती करायला पुष्कळ चांगले वाटते. आभारी आहोत, धन्यवाद !’ (११.६.२०२०)

५. कु. आर्या डिचोलकर (डोंबिवली)

अ. ‘मी मागील ३ मासांपासून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्ग ऐकत आहे. माझी शाळा चालू झाल्यावर मी बालसंस्कारवर्गाचे पुनर्प्रक्षेपण बघते; कारण मला आणि आईला तो वर्ग पुष्कळ आवडतो.

आ. बालसंस्कार वर्ग घेणार्‍या बाई पुष्कळ छान आणि शांतपणे सर्व गोष्टी व्यवस्थित सांगतात. मला गोष्टी पुष्कळ आवडतात आणि बालसंस्कार वर्गात प्रतिदिन नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. या वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील गोष्ट वाचल्यावर ‘ही गोष्ट बालसंस्कार वर्गात सांगितली आहे’, हे मला आठवले.

 इ. ‘आदर्श कृती कोणती ?’, हेही त्या पुष्कळ चांगले सांगतात. बालसंस्कार वर्गात ‘स्वच्छता’ ही आदर्श कृती मी ऐकली आणि आता प्रत्येक रविवारी मी घराच्या खिडक्या पुसते.

ई. या सत्संगामुळे ‘आपल्या देशाचा मान कसा राखायचा ?’, हे माझ्या लक्षात आले. एका सत्संगात ‘भारतीय वस्तू का वापरायच्या ?’, हे सांगितले होते; म्हणून मी बिस्किटांच्या आच्छादनावर ‘ती बिस्किटे कोणत्या देशात बनली आहेत ?’, हे पहाते.

उ. बालसंस्कार वर्गामुळे मी संस्कृतमध्ये ‘गणपतिस्तोत्र’ म्हणायला शिकले.’ (२७.६.२०२०)

६. सौ. मीरा डिचोलकर, डोंबिवली

अ. ‘मी आर्याच्या (मुलीच्या) शाळेतील पालकांच्या गटाला आणि आमच्या इमारतीतील लहान मुलांच्या पालकांना ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाविषयी सांगितले आणि सर्वांना त्याची ‘लिंक’ पाठवली.

आ. आमच्या इमारतीमधील कु. काव्या धर्माधिकारी (इयत्ता ४ थी) ही प्रतिदिन बालसंस्कारवर्ग ऐकते. तिला त्यातील कथा पुष्कळ आवडतात. काव्याच्या आईने ही ‘लिंक’ तिच्या गटातील अन्य पालकांनाही पाठवली आहे.’ (३.७.२०२०)

७. सौ. गीतांजली भारती (वाचक, चेंबूर)

‘नामजप होत असल्याने आणि सत्संग मिळत असल्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा जराही ताण येत नाही. सत्संग चुकला, तरी त्याचे पुन्हा प्रक्षेपण होते. त्यामुळे तेव्हा सत्संग ऐकण्याचा प्रयत्न करते.’

८. श्री. बाळू मातेले, विक्रोळी पार्कसाइट

‘आपला हा सत्संगांचा नित्यक्रम छानच आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आजच्या पिढीला ठाऊक झाल्या पाहिजेत आणि त्यांचे महत्त्वही लक्षात आले पाहिजे. ‘प्रत्येक सणाचे महत्त्व आणि तो कशा पद्धतीने साजरा करावा ?’, हे आजच्या पिढीला कळायलाच हवे. ही सर्व माहिती आपण आम्हाला ‘ऑनलाईन’ सांगत आहात; म्हणून आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद ! आपल्याकडून असेच सहकार्य मिळू दे.’ (६.७.२०२०)