गोरखनाथ मंदिरावर झालेल्या जिहादी आक्रमणाची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक !
उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिरावर अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या जिहाद्याने ३ एप्रिलच्या रात्री ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देत कोयत्याद्वारे आक्रमण केले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मंदिराचे महंत आहेत. त्यामुळे हे मंदिर हिंदुत्वाचे प्रतीक असून त्याला विशेष महत्त्व आहे. योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी राष्ट्रहित आणि हिंदुहित साधणारे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ते महंत असलेले हे मंदिर आतंकवाद्यांच्या डोळ्यांत खुपते. या मंदिराला यापूर्वीही जिहादी आतंकवाद्यांकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुर्तजा याला अटक केल्यानंतर काही गंभीर गोष्टी समोर आल्या असून त्याच्या ‘लॅपटॉप’मधून सीरिया आणि ‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित, तसेच हिंदुद्वेष्टा पसार आतंकवादी झाकीर नाईक याचे अनेक ‘व्हिडिओ’ मिळाले आहेत. मुर्तजा मुंबई आणि नेपाळ येथून अनेक लोकांशी ‘चॅटिंग’ (बोलणे) करत असल्याचे समोर आले आहे. मुर्तजाकडून सुरक्षायंत्रणांना जी कागदपत्रे मिळाली आहेत, त्यात जामनगर (गुजरात), मुंबई (महाराष्ट्र) अशा राज्यांशी संबंधित काही गोष्टी मिळाल्या आहेत. त्याही पुढे जाऊन मुर्तजा ‘येमेन येथील इमाम अनवर अल हालाकी याला स्वतःचा नेता मानत होता’, हेही समोर आले आहे. याचा अर्थ हे प्रकरण केवळ एका राज्यापुरते सीमित नसून ‘यामागे पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे’, असे म्हणण्यास निश्चित वाव आहे !
तात्काळ कारवाई का नाही ?
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सुरक्षायंत्रणांनी ‘नेपाळच्या मार्गे आतंकवादी उत्तरप्रदेशात येऊ शकतात’, अशी शक्यता वर्तवली होती. ज्यात ‘गोरखनाथ मंदिर, काशी विश्वनाथ धाम, अयोध्येतील श्रीराममंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिरांना सर्वाधिक धोका आहे’, अशी सूचना मिळाली होती. मुर्तजाला अटक केल्यावरही त्याने मान्य केले की, पोलिसांनी त्याच्या घरी अन्वेषण केल्यावर तो नेपाळला पळून गेला. तेथून परत आल्यावर त्याने हे आक्रमण केले. यावरून सुरक्षायंत्रणांना ज्याप्रकारे माहिती मिळाली होती, त्याचप्रकारे मुर्तजा हाही नेपाळ येथूनच आला. त्यामुळे यंत्रणेने दिलेली ही सूचना प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.
आक्रमणकर्ता मुर्तजा गेल्या २१ मासांपासून ‘उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाच्या दृष्टीक्षेपात होता’, तसेच मुर्तजानेही आखाती देशांमध्ये काही रक्कम पाठवली होती. याचसमवेत वर्ष २०२० मध्ये पाकिस्तानला माहिती पुरवण्यात आलेला एक हेर पकडला होता, ज्याने मुर्तजाचे नाव घेतले होते, अशा काही गोष्टी अन्वेषणात समोर आल्या आहेत. इतके सगळे आहे, तर ‘मुर्तजावर अगोदरच कारवाई का करण्यात आली नाही ?’, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्याही मनात निर्माण होऊ शकतो. मुर्तजा जेव्हा कोयता घेऊन रस्त्यावरून मंदिराकडे धावत गेला, तेव्हा ‘त्याच्या हातात जर ‘बाँब’ असता तर तो काय करू शकला असता?’, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घटनास्थळी गेल्यावर तो ‘अल्लाह हू अकबर.. मै चाहता हूं, तुम लोग मुझे गोली मार दो’, असे ओरडत होता; म्हणजे ‘तो मरणे आणि मारणे’ या दोन्हीसाठी पूर्णपणे सिद्ध होता’, असेच म्हणावे लागेल. मुर्तजा याने आयआयटी मुंबई येथून रसायनशास्त्र अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो त्याच्या कुटुंबियांसमवेत मुंबईत रहात होता. यावरून धर्मांधांनी कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी त्यांच्या जिहादी मानसिकतेत फरक पडत नाही, हेच समोर येते !
भारतातील असुरक्षित मंदिरे !
गोरखनाथ मंदिर हे ५२ एकराच्या विस्तीर्ण परिसरात आहे. हे मंदिर नाथ संप्रदायाचे असून देशातील प्राचीन योग आणि अध्यात्माचे केंद्र आहे. १२ वर्षांच्या कठोर तपस्येनंतर येथे संन्यासपदाची दीक्षा दिली जाते. या मंदिरावर स्वातंत्र्यपूर्व काळातही जिहाद्यांकडून आक्रमण झालेले आहे. १४ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी याने आणि नंतर १८ व्या शतकात धर्मांध क्रूरकर्मा औरंगजेबानेही यावर आक्रमण केले होते. या दोन्ही आक्रमणांनंतर मंदिराची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती; मात्र यानंतरही मंदिराने स्वतःच्या परंपरा जपल्या असून हिंदुत्वरक्षणाचे कार्य चालू ठेवले आहे.
योगी आदित्यनाथ हे गेल्या १० वर्षांपासून इस्लामिक आतंकवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत. ७ डिसेंबर २००८ या दिवशी झालेल्या हिंदु युवा वाहिनीच्या फेरीत योगी आदित्यनाथ यांच्या गाडीवर पेट्रोल बाँब टाकण्यात आला होता. त्यात एक कार्यकर्ता ठार झाला होता. ‘जैश ए महंमद’ आणि ‘लष्कर ए तोयबा’ यांसारख्या आतंकवादी संघटनाही योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करू पहात आहेत. २४ एप्रिल २०२० या दिवशी एका धर्मांध शिपायाने त्याच्या फेसबूकवर ‘योगी आदित्यनाथ यांना गोळी मारली पाहिजे’, असे लिहिले होते.
योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यापासून त्यांनी दंगलखोर आणि लव्ह जिहादी यांना वठणीवर आणण्याचे काम हाती घेतले आहे. ते धर्मांधांच्या अयोग्य कृतींच्या विरोधात थेट बोलण्याचे धाडस दाखवतात. आझम खान यांच्यासारख्या समाजवादी पक्षाच्या धर्मांध नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांनी थेट कृती करूनही दाखवली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे भविष्यातील पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात राज्य आणि केंद्र येथील सुरक्षायंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे. त्याही पुढे जाऊन केवळ गोरखनाथच नव्हे, हिंदूंच्या धार्मिक भावना ज्यांच्याशी निगडित आहेत, त्या प्रत्येक मंदिराच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. यासह हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.