गुरुदास भोसले यांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ !


सातारा, ६ एप्रिल (वार्ता.) – येथील धर्माभिमानी हिंदु श्री. गुरुदास भोसले यांच्या माळवाडी, दिव्यनगरी येथील निवासस्थानी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. गत ४ वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भोसले यांनी ४ ते ८ एप्रिल २०२२ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. ४ एप्रिल या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करून पारायणाला प्रारंभ झाला.

५ दिवस चालणार्‍या या पारायण सोहळ्यात माळवाडी, दिव्यनगरी येथील भाविक सहभागी होणार असून ८ एप्रिल या दिवशी पारायण झाल्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे. तरी समस्त हरिभक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गुरुदास भोसले यांनी केले आहे.