पाकिस्तानी लोकशाही !

संपादकीय

पाकमध्ये पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेले सरकार त्याचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. पाकच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान सरकारच्या विरोधातील अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला आणि इम्रान यांची संसद विसर्जित करण्याची विनंती राष्ट्रपतींनी तात्काळ मान्य करून पुढील ९० दिवसांत निवडणुका घेण्याचाही आदेश दिला, म्हणजे इम्रान खान यांना ठाऊक होते की, त्यांच्याकडे बहुमत नाही आणि पुढील कारभार ते करू शकत नाहीत. यामुळेच मतदान घडवून सरकार पडून विरोधी पक्षांचे सरकार येण्यापेक्षा पुन्हा निवडणुका घेणे कधीही उत्तम, असाच त्यांचा यामागे विचार होता आणि तो यशस्वी ठरला आहे. आता एकूण घटनाक्रमाच्या विरोधात विरोधी पक्ष सर्वाेच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. जर न्यायालयाने ‘संसदेमध्ये ज्या पद्धतीने अविश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेता तो फेटाळण्यात आला’, ही प्रक्रिया चुकीची ठरवली, तर कायदेशीर संकट निर्माण होऊ शकते. न्यायालयाला मग संसद विसर्जित करण्याचा आदेशही रहित करावा लागेल; कारण तरच या ठरावावर संसदेत मतदान घेता येईल. जर असे झाले, तर इम्रान खान सरकार कोसळेल आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षाला आमंत्रित करावे लागेल. ही स्थिती न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून आहे. अर्थात् ही जर-तरची गोष्ट आहे.

अस्थिर सरकारे

सध्या तरी इम्रान खान यांचे सरकार केवळ साडेतीन वर्षेच सत्तेवर राहू शकले. पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते. आताचे इम्रान खान यांचे सरकारही त्याला अपवाद नव्हते; मात्र हे सरकार जाण्यामागे पाकच्या सैन्याचा किती हात आहे ?, हे उघडपणे समोर आलेले नाही. विरोधी पक्षांकडून या सरकारला घेरण्यात आल्याने त्याला जावे लागले आहे. पाकच्या विरोधी पक्षांकडूनच नव्हे, तर जनताही हेच म्हणत होती की, पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार ‘निवडून’ आलेले नाही, तर ‘निवडलेले’ सरकार आहे. सैन्याने त्यांना निवडून आणले आणि सत्तेवर बसवले. यामागे सैन्याचा स्वार्थ होता. पाकमधील बिलावल भुत्तो यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ आणि नवाज शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग (एन्)’ या पक्षांच्या पेक्षा इम्रान खान यांच्या पक्षाला सत्तेवर बसवले, तर ते आपण सांगतील, ते ऐकतील’, असा विश्वास होता. भुत्तो आणि शरीफ यांचे पाक सैन्याशी सूर जुळत नसल्याने त्यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यात आले. आता या दोघांनीच इम्रान खान यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला नसला, तरी संसद विसर्जित झाल्याने पुन्हा निवडणुका होणार आहेत. यात पुन्हा एकदा पाकचे सैन्य कुणाच्या पारड्यात वजन टाकणार ? त्यावर पुढील सरकार ठरणार आहे. आता असे वृत्त आहे की, पाकच्या सैन्यामुळेच पाकमध्ये विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देण्यापासून रोखण्यात आले आणि संसद विसर्जित करण्यात आली. ‘आता नव्याने निवडणुका होऊन पाकचे सैन्य पुन्हा इम्रान खान यांनाच सत्तेवर बसवण्याचा प्रयत्न करणार आहे’, असे म्हटले जात आहे.

पाकची अनेक शकले होण्याच्या मार्गावर !

पाकिस्तान विधानसभा

पाकची सध्याची स्थिती वाईट झालेली आहे. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाकला सातत्याने विदेशातून कर्ज काढून दिवस ढकलावे लागत आहेत. पुढील काही मासांत किंवा वर्षांत पाकची स्थिती सध्या श्रीलंकेची जी स्थिती आहे, त्यापेक्षा वाईट झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यातून पाकची अनेक शकले झाली, तरी ते आश्चर्यजनक नसेल, अशी स्थिती आहे. सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यासाठी उघडपणे आंदोलने चालू आहेत. उद्या पाकमध्ये अराजक निर्माण झाल्यावर हे प्रांत स्वतःला स्वतंत्र घोषित करू शकतात. पाकच्या सैन्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी तो कितपत यशस्वी होईल ? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे पाकमध्ये आता निवडणुका होऊन नवीन सरकार आले, तरी त्यांच्या समोर अनेक मोठ्या समस्या असतील, त्यातून ते सरकार पाकला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुढे नेऊ शकते, असे तरी वाटत नाही. त्यात पाकच्या सैन्याच्या मनानुसार झाले नाही, तर ते सरकार टिकेल का ? हाही प्रश्न आहे. कदाचित् या काही गोष्टी इम्रान खान यांना ठाऊक असल्याने त्यांनी अविश्वासदर्शक ठरावाच्या आधी केलेली विविध भाषणे आणि मुलाखती यांमध्ये भारताचे कौतुक करण्याचा प्रयत्न केला. ‘भविष्यात भारताकडे साहाय्य मागता येईल’, असा त्यामागे इम्रान खान यांचा उद्देश असू शकतो’, असे म्हटले जात आहे. पाकमधील राजकीय स्थितीचा भारतावर काही परिणाम होणार नाही. उलट पाकमध्ये अस्थिरता निर्माण झाली, तर ते भारताला हवेच आहे, असे म्हणू शकतो. यामुळे पाकचे सैन्य पाकमध्येच अडकून पडेल आणि त्याचे काश्मीरमध्ये कारवाया करण्यापासून दुर्लक्ष होईल. जिहादी आतंकवाद्यांना मर्यादा येतील. दुसरीकडे असेही म्हटले जाते की, अशा स्थितीत देशातील जनतेला राष्ट्रवादाच्या नावाखाली एकत्र आणण्यासाठी पाकचे सैन्य त्यांचे लक्ष अस्थिरतेकडून हटवण्यासाठी भारताशी युद्ध करण्याची किंवा एखादा मोठा वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याची भारताला काही हानी होण्याची शक्यता नाही. उलट पाकमधील स्थिती आणखी वाईट होऊ शकते. पाकला पूर्वीप्रमाणे अमेरिकेचे कोणतेही साहाय्य मिळत नाही. पाकने चीनसमोर लोटांगणच घातले आहे. तो पाकला साहाय्य करतांना पाकला जेवढे ओरबाडता येईल, तेवढे तो करील, हे इम्रान खान यांना ठाऊक असणार. दुसरीकडे इम्रान खान यांनी रशियामध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतल्याचा पाकला कोणताही लाभ झालेला दिसत नाही. त्यामुळेच भारत आता इम्रान खान यांना जवळचा वाटू लागला आहे, हे नक्की !