प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

राजापूर येथे हिंदवी प्रतिष्ठान निर्मित ‘हिंदु पंचांग’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना डावीकडून प.पू. उल्हासगिरी महाराज, पू. चंद्रसेन मयेकर, श्री. गंगाधर नवरे आणि श्री. गोविंद कुलकर्णी
प.पू. उल्हासगिरी महाराज

राजापूर, २ एप्रिल (वार्ता.) – भारत भूमीमध्ये इंग्रजांना जाऊन ७५ वर्षे उलटली, तरीही पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आपल्या देशात चालू आहे. ते आपल्या संस्कृतीला घातक असून प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी केले. ते येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या ‘हिंदु पंचांग’ दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

३० मार्चला राजापूर नगर वाचनालयाच्या सभाग्रहात हा कार्यक्रम पार पडला झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून प.पू. उल्हासगिरी महाराज उपस्थित होते. या वेळी सनातनचे पू. चंद्रसेन मयेकर, लक्ष्मी केशव मंदिराचे विश्‍वस्त श्री. गंगाधर नवरे, श्री लक्ष्मी-नारायण गणपती देवस्थानचे विश्‍वस्त श्री. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘अनेक हिंदू १ जानेवारीला नववर्ष साजरे करतात; मात्र आपले नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रारंभ होते. याविषयी आता हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना जनजागृती करत आहेत; मात्र धर्मानुसार कृती केली पाहिजे, याविषयी अधिक व्यापक स्वरूपात प्रबोधन होणे आवश्यक आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या या हिंदवी प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांचे मी कौतुक करतो.’’

या वेळी श्री लक्ष्मी-नारायण गणपती देवस्थानचे विश्‍वस्त श्री. गोविंद कुलकर्णी यांनी हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करण्याची आवश्यकता सांगितली.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांनीही प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते घेत असलेली विशेष मेहनत खूपच उपयुक्त असल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले. ‘यापुढेही व्यापक स्वरूपात हिंदु संस्कृतीच्या कार्यासाठी वेळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पुरोहित श्री. बापू नवरे यांनी पंचांगाची ओळख आणि महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश मयेकर यांनी केले.


‘हिंदु पंचाग’ ही दिनदर्शिका प्रत्येक हिंदूच्या घरात हवी ! – पू. चंद्रसेन मयेकर

पू. चंद्रसेन मयेकर

हिंदु धर्माच्या संवर्धनासाठी आणि संस्कृती रक्षणासाठी मूळ प्राचीन कालगणना असलेली ईश्‍वरनिर्मित, निसर्गावरती आधरित आणि सर्व जगाला मार्गदर्शक ठरलेली मराठी मासांची ‘हिंदु पंचांग’ दिनदर्शिका हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने निर्माण केली, हे कार्य कौतुकास्पद आहे . अशा प्रकारे हिंदु धर्माच्या संस्कृती आणि परंपरा जतन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. ही दिनदर्शिका प्रत्येक हिंदूच्या घरात असायला हवी.