हिंदी चित्रपटसृष्टीच्या (बॉलीवूडच्या) हिंदुद्रोहाविषयी आपण सर्वांनी बरेच मुद्दे ऐकले आहेत. त्यामध्ये हिंदु साधूंना गुंड दाखवणे, चुकीचे कृत्य करतांना दाखवणे; मुसलमान कुटुंब साहाय्य करणारे, तर हिंदु कुटुंब हिंसक दाखवणे, मुसलमान मुलगा आणि हिंदु मुलगी यांची मैत्री कशी चांगली असते, ते दाखवून लव्ह जिहादचे समर्थन करणे, अशा अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. मुळातच हिंदु संस्कृती भ्रष्ट करणे, हे बॉलीवूडचे ध्येय असल्याने चित्रपटातून ते विविध प्रकारे हिंदु संस्कृतीवर घाव घालत असल्याचे लक्षात येते. यातील एक मुख्य भाग, म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातून दिले जाणारे संदेश !
१. मैत्रीविषयी अयोग्य संदेश देणारे चित्रपट
‘३ इडियट्स’, ‘गोलमाल सिरीज’, ‘धमाल सिरीज’, ‘कॉकटेल’, अशा अनेक हिंदी चित्रपटांत याची अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये सगळे मित्र मिळून कशी टिंगलटवाळी करत आहेत, हे दाखवले आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून शाळा किंवा महाविद्यालय ही केवळ एक स्पर्धा आहे, जिथे कुणी मित्र नाही, तर सगळे शत्रू आहेत’, असे चित्र निर्माण केले गेले आहे. ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटामध्ये ‘हम नहीं सुधरेंगे, थोडा और बिगडेंगे, हम नहीं सुधरेंगे (आम्ही सुधारणार नाही, आम्ही अजूनच बिघडत जाणार)’, अशा आशयाचे गाणे आहे.
२. चित्रपटांनी पालटले मैत्रीचे स्वरूप
आपली महान हिंदु संस्कृती स्वतःमधील दुर्गुण शोधून ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते. ‘ज्या हिंदु संस्कृतीत लाखो वर्षे तपश्चर्या करून दोषविरहित होणे शिकवले आहे, त्या भूमीवर आम्ही अजूनच बिघडत जाणार’, अशा प्रकारच्या वृत्तीचे समर्थन होत आहे. थोडक्यात या गीताच्या माध्यमातून जे अयोग्य आहे, ते करण्याचा संदेश दिला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून तरुण पिढीला मौजमजा करणे, टिंगल-टवाळ्या करणे, हेच आयुष्य वाटायला लागले आहे. ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातील ‘हर एक फ्रेंड कमिना होता है’, हे गाणेही त्यातीलच एक आहे. यामध्ये मित्र म्हणजे सर्वांत स्वार्थी, वरवर प्रेमभाव दाखवून मागे द्वेष करणारा, मित्रांचा आदर न करता सर्वांसमोर त्याला तोंडघशी पडणारा असतो, असे दाखवले आहे. थोडक्यात मैत्रीचे स्वरूपच पालटले आहे.
३. मुलांना बॉलीवूडपासून लांब ठेवा !
मैत्री म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाचे उदाहरण येते. त्याने बालसखा सुदाम्यासाठी तो राजा आहे कि रंक ?, याचा विचार न करता त्रैलोक्याचा त्याग करण्याची सिद्धता दाखवली. श्रीरामाने कपिराज सुग्रीवाला अग्नीच्या साक्षीने मित्र मानून सदा साहाय्य करण्याचे वचन दिले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु हे ३ मित्र भारतमातेसाठी एकत्र फासावर चढले, त्यांचे उदाहरण येते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ आगरकर यांची मैत्री आठवते, त्यांनी एकत्र स्वातंत्र्याचे स्वप्न बघितले. त्याच भारतात आज मैत्रीची व्याख्या पालटून नवीन पिढीला भरकटवले जात आहे. खरे तर हा सगळा हिंदूंची पिढी उद़्ध्वस्त करण्याचा कट आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे.
मुळात बॉलीवूड हे डावपेच नवीन पिढीवर लागू न होण्यासाठी हिंदु माता-पित्यांनी आपल्या मुलांना योग्य-अयोग्य यांचे संस्कार दिले पाहिजेत, तसेच आपल्या मुलांना बॉलीवूडपासून लांब ठेवणे आणि आपल्या हिंदु संस्कृतीची ओळख करून देणे आवश्यक आहे.
– कु. सायली देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.