प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं स्वित् उच्चतरं च स्वात् ?
अर्थ : आकाशापेक्षाही उन्नत (श्रेष्ठ) कोण ?
उत्तर : पिता.
‘मातृदेवो भव’, हा जसा आदेश आहे, त्याप्रमाणेच ‘पितृदेवो भव’, हाही एक आदेश आहे. मुलाला जन्म देण्यात, त्याचे पालन-पोषण करण्यात आईला अपरंपार कष्ट उपसावे लागतात, हे खरेच; पण बापालाही मुलाला वाढवतांना अतिशय दक्ष रहावे लागते. ‘आमच्यासाठी तुम्ही काय केले ?’, असे उर्मटपणे विचारणारीही मुले आहेत. इतकेच नव्हे, तर ‘तुम्हाला रहावले नाही; म्हणून आमचा जन्म झाला’, असे उद़्गारही नीचपणे काढले जातात. अशा अधम प्रवृत्तीच्या काटर्यांना (मुलांना) काय सांगणार ? अशांची संख्या फार मोठी नाही, हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे.
मातृभक्त-पितृभक्त असणे, हे मुलांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे. ज्या शरिराद्वारे जीवनाचा उपभोग नाना प्रकारांनी घेतला जातो; विलास, ऐश्वर्य, मान आणि सन्मान यांच्यामुळे लाभणारे सुख अनुभवता येते, ‘ते शरीर आईबापांनी दिले आहे’, हे विसरून चालण्यासारखे नाही. कुटुंब आणि समाज यांची धारणा माता-पिता या संकल्पनेतूनच होते. जनावरे आणि माणूस यांमध्ये श्रेष्ठतेच्या दृष्टीने जे अंतर पडते, त्याला जी अनेक कारणे आहेत, त्यात माता-पित्यांची भूमिका हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून माता-पिता हे प्रत्येक माणसाच्या प्रेम, आदर आणि श्रद्धा यांचे विषय असले पाहिजेत. तसे नसणे, हे कृतघ्नतेचे लक्षण आहे आणि कृतघ्नता हे ज्याला प्रायश्चित्त नाही, असे घोर पातक आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)
योगी होण्यासाठी कर्मयोगाचा सातत्याने अभ्यास करणे महत्त्वाचे !
कोणत्याही स्थितीत चित्त समाधानी रहाणे, म्हणजेच हवे-नको सुटणे, म्हणजेच सर्व द्वंद्वाच्या परिणामातून मुक्त होणे. याचाच अर्थ समत्वाला प्राप्त होणे आणि याच स्थितीला ‘योगी होणे’, असे म्हणतात. अशी स्थिती प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, त्याने कर्मयोगाचा अर्थात कर्तव्यकर्म करण्याचा, तीही फलाकांक्षेवाचून करण्याचा प्रयत्नपूर्वक सातत्याने अभ्यास केला पाहिजे. (साभार : ‘आत्मसंयम योग’ ग्रंथ)
जे हिताचे आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे !
जे स्वतःच्या हिताचे ते श्रेष्ठ ! हे श्रेष्ठतेचे खरे गमक साधकदशेत तरी मानलेच पाहिजे. मला काय आवडते, मला काय सोयीचे वाटते, इतर लोक कशाचा अवलंब करतात, त्यावरून चांगल्या-वाईटाचा निर्णय घेणे, हे क्वचितच उचित ठरते; पण मनुष्यस्वभाव असा आहे की, जे हिताचे ते त्याला श्रेष्ठ वाटत नाही आणि मग शास्त्राला पित्याच्या कळवळ्याने ‘जे हिताचे आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे’, म्हणून सांगणारी आग्रही भूमिका घ्यावी लागतेे. (साभार : ‘कर्मयोग’ ग्रंथ)
– प.पू. स्वामी वरदानंद भारती