आई ही पृथ्‍वीपेक्षाही मोठी आणि गौरवास्‍पद !

प.पू. स्‍वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्‍य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्‍न : किं स्‍वित् गुरुतरं भूमेः ।

अर्थ : पृथ्‍वीपेक्षाही अधिक गौरवास्‍पद कोण ?

उत्तर : माता ।

१. संन्‍याशाने जन्‍मदात्‍या आईला नमस्‍कार करावा, अशी तिची थोरवी असणे

आई ही पृथ्‍वीपेक्षाही मोठी आणि गौरवास्‍पद आहे. आपल्‍या परंपरेमध्‍ये शिक्षण संपून गुरुकुलातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्‍याला जो उपदेश केला आहे, त्‍यात सर्वप्रथम ‘मातृदेवो भव । आईला देव मानत जा’, असा आदेश दिला आहे.

‘ऋण न जन्‍मतेचे फिटे. आईच्‍या ऋणातून मुक्‍त होता येत नाही’, असे मोरोपंत म्‍हणतात. ‘आई, थोर तुझे उपकार’, अशा अर्थाची कविता पूर्वी क्रमिक पुस्‍तकात होती. श्रीमद़्‍शंकराचार्यांसारख्‍या महापुरुषानेही संन्‍यास धर्माच्‍या थोडे बाहेर जाऊन आईच्‍या शब्‍दाचा मान ठेवला. संन्‍याशाने कुणाला नमस्‍कार करू नये, देवालासुद्धा करू नये. मुलगा संन्‍याशी झाला, तर बापानेही त्‍याला नमस्‍कार करावा; पण अशा श्रेष्‍ठ संन्‍यास धर्मातही ‘जन्‍मदात्‍या आईला संन्‍याशाने नमस्‍कार करावा’, असा आचार आहे. खरे म्‍हणजे आईची थोरवी आवर्जून सांगण्‍याचा प्रसंग येऊ नये; पण बाहेरची सामाजिक परिस्‍थिती झपाट्याने पालटत आहे.

२. हिंदु धर्माची थोरवी

आई म्‍हणून मुलाला जन्‍म देणार्‍या स्‍त्रियांच्‍या अंतःकरणातील वात्‍सल्‍य लोप पावू लागले आहे. ‘आपल्‍या सौख्‍यात अडथळा येतो’, या भावनेने पोटच्‍या तान्‍ह्या मुलाचा छळून (बेबी टॉर्चर) जीव घेणार्‍या आया परदेशात आढळून येतात. आपल्‍याकडेही तुरळकपणे अशा घटना घडतात, असे वाचण्‍यात येते. श्रीशंकराचार्यांनी मातेचा गौरव करतांना मोठ्या आदराने ‘कुपुत्रो जायेत क्‍वचिदपि कुमाता न भवति ।’ (देव्‍यपराधक्षमापनस्‍तोत्र, श्‍लोक २), म्‍हणजे ‘कुपुत्र (वाईट पुत्र) जन्‍माला येईल; पण कुमाता (वाईट माता) कदापि नसते’, असे विश्‍वासाने म्‍हटले आहे, म्‍हणजे ‘कुपुत्र’ त्‍या काळीही होते; पण ‘कचिदपि कुमातापि भवति’, असे म्‍हणण्‍याचा प्रसंग आता आलेला आहे. सुदैवाने अजूनही आपल्‍याकडे कुमातेची उदाहरणे अत्‍यल्‍प आहेत. ही आपल्‍या हिंदु धर्माची थोरवी आहे. आपल्‍या पूर्वजांच्‍या पुण्‍याईमुळे हा लाभ आपल्‍याला मिळतो आहे. तो टिकवून ठेवण्‍याचे कर्तव्‍य आपल्‍याला पार पाडले पाहिजे.

– प.पू. स्‍वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्‍न’)