अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी दौसा (राजस्थान) येथे काँग्रेसच्या आमदाराच्या मुलाला अटक

आरोपी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा असल्याने त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्पच आहे, असे जनतेला वाटत असणार, यात शंका नाही ! – संपादक

दौसा (राजस्थान) – येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार जोहरीलाल मीणा यांचा मुलगा विवेक शर्मा, दीपक आणि नेतराम, तसेच इतर २ तरुणांना अटक करण्यात आली. येथील मंडवार पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका उपाहारगृहात या मुलीला अमली पदार्थ सेवन करण्यास देऊन  तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुख्य आरोपी विवेक याने या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने या मुलीवर अनेकदा बलात्कार केला, तसेच मुलीकडून साडेपंधरा लाख रुपये आणि दागिने उकळले. मुलीने घरातून आईचे पैसे आणि दागिने आरोपीकडे आणून दिले होते.

आमदार जोहरीलाल मीणा यांनी या घटनेविषयी सांगितले की, मला या प्रकरणाविषयी काहीही माहिती नाही. मला कुणीतरी दूरभाष करून याविषयी सांगितले. माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे.