देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त न करता यूट्यूबवर टाकण्याविषयी केलेल्या विधानाचे प्रकरण

हे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २४ मार्च या दिवशी देहली विधानसभेत ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांवर प्रकाश टाकणारा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची भाजपच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर बोलतांना ‘हा चित्रपट चित्रपट निर्मात्याने ‘यूट्यूब’वर ‘अपलोड’ करावा’, असे दायित्वशून्य विधान केले होते. या विधानावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २५ मार्च या दिवशी ट्वीट करून म्हणाले, ‘‘केजरीवाल सरकारने यापूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपट करमुक्त घोषित केले आहेत; मात्र मुख्यमंत्री केजरीवाल ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी असे करतांना दिसत नाहीत.

याही पुढे जाऊन मुख्यमंत्री केजरीवाल काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर हास्यविनोद करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हा निर्दयीपणा आहे. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा हा अवमान आहे.’’