काहीही झाले तरी त्यागपत्र देणार नाही ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जे माझे त्यागपत्र मागतात त्यांनी नीट ऐकावे, शेवटच्या चेंडूपर्यंत कसे खेळायचे, हे मला ठाऊक आहे. मी त्यागपत्र देणार नाही. माझ्याकडे हुकूमाचा एक्का (पत्त्यांच्या खेळामधील एक पत्ता) शिल्लक आहे. तो पाहून जगालाही आश्‍चर्य वाटेल, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्‍वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खान बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, विरोधकांकडे ना बोलायला काही आहे, ना करायला. त्यांनी त्यांचे पत्ते उघडले आहेत; परंतु मी वेळेवर उघडीन. संसदेत अविश्‍वास प्रस्ताव येऊ द्या, मग काय होते ते बघू. विरोधी पक्ष कधीही यशस्वी होणार नाहीत.