छत्रपती शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी देवाची उपासना करणे आवश्यक ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

डायघर (ठाणे) येथे शिवजयंती उत्सव 

ठाणे, २२ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र केवळ वाचून सोडून न देता ते जगायला पाहिजे, तसेच आचरणात आणायला पाहिजे. आज आपल्या राष्ट्रावर आलेली संकटे परतवून लावायची असतील, तर महाराजांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी संघटित होऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ दिला पाहिजे. शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी आपण नियमित देवाची उपासना करणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी काढले. ते डायघर येथील भंडार्ली गावातील शंभूराजे युवा प्रतिष्ठान, बजरंग दल ग्रामस्थ मंडळ आणि नवतरुण महिला वर्ग यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील कदम

कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजनाने, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. श्रीपाद पाटील, गावचे पोलीस पाटील श्री. आत्माराम पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, युवावर्ग आणि महिला असे जवळपास ५० हून अधिक जण उपस्थित होते.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात समजून घेण्यासाठी २८ मार्च या दिवशी येथील शंकर मंदिरातील आरती झाल्यावर एकत्र येण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !

शंभूराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तसेच कार्यक्रमाचे आयोजक श्री. गिरीश पाटील म्हणाले, ‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची ओळख झाल्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात समजले. त्यासाठी काय करायला हवे, याची मला दिशा मिळाली; म्हणून मी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी नमन करतो.’’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. नामदेव पाटील यांनी ‘आपण सर्वांनी पद, पक्ष, संघटना बाजूला ठेवून एक व्हायला हवे आणि हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायला हवे’, असे सांगितले, तर गावातील ग्रामस्थांनी २८ मार्च या दिवशी शंकर मंदिरातील आरती झाल्यावर एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात समजून घेण्याचे ठरवले आहे.