बैठक बोलावून जेटीच्या कामाविषयी निर्णय घेऊ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे साखरीआगर येथे जेटीच्या कामाला वर्ष २०१२ मध्ये प्रारंभ होऊनही अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. या संदर्भात एका अधिकार्याने ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, तरी जेटीच्या कामाला निधी देणार नाही’, असे सांगितले आहे. ‘जर सरकारने हाती घेतलेल्या कामास अधिकारीच निधी देणार नाही, तर राज्य सरकार कारभार चालवते कि अधिकारी ?’, असा प्रश्न विचारून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवसह इतर सदस्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना धारेवर धारले. शेख यांनी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. शेवटी अजित पवार यांनी याप्रश्नी लवकरच बैठक बोलावून निर्णय घेऊ, निधी देण्याविषयी संबंधित अधिकार्याला शांतपणे समजावून सांगू, अन्यथा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवू, असे स्पष्ट केले. सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत २२ मार्च या दिवशी ही लक्षवेधी मांडली होती.
लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री अस्लम शेख म्हणाले की, या जेटीसाठी जिल्हा विकासनिधी (डीपीडीसी) उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे सदस्यांनी काळजी करू नये. १ आठवड्यात याविषयी बैठक घेतो. निधी देण्यास आडकाठी करणार्या संबंधित अधिकार्याची पुढील १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. अनेक सदस्यांनी हरकत घेत स्वतःची मते मांडली, तसेच तालिका सभापतींनी शेख यांच्या उत्तरावर अप्रसन्नता व्यक्त केली. शेवटी अजित पवार म्हणाले की, जेटीला राज्य सरकारनेच निधी दिला पाहिजे. हा प्रकल्प राज्य सरकारचा आहे, तसेच जिल्हा विकास निधीतून पैसा द्यायचा असेल, तर पालकमंत्र्यांची अनुमती लागते. त्यामुळे लवकरच या प्रश्नी बैठक घेऊन निर्णय घेऊ.