हिंदूंची अशीही गळचेपी !

उत्तरप्रदेश येथील एका चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून परतणार्‍या ३ हिंदूंवर धर्मांधांच्या जमावाने आक्रमण करून त्यांना गंभीररित्या घायाळ केले. यांतील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजस्थान येथील कोटामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात अडथळे आणण्याचा एक प्रयत्न म्हणजे तेथे कलम १४४ लागू करण्यात आले. हे जमावबंदीचे कलम असल्याने साहजिकच हिंदूंना चित्रपट पहाण्यास जातांना मर्यादा येणार. तेलंगाणा येथील एका चित्रपटगृहात हा चित्रपट चालू असतांना एका धर्मांध स्त्रीने गोंधळ घातला. तेव्हा हिंदूंनी तिला विरोध केल्यावर तिने ‘काश्मीरमध्ये जसे झाले, तसे पुन्हा होणार’, अशी धमकीच दिली. भिवंडी आणि गोवा येथील चित्रपटगृहात जाणूनबुजून चित्रपट सुरळीतपणे जनतेला पहाता न येण्यासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या चित्रपटाच्या संदर्भात ‘खाना’वळीकडून काहीच मतप्रदर्शन होत नसल्याची चर्चा होती. अभिनेते आमीर खान यांनी या चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर ‘त्यांचा आगामी ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपट ‘फ्लॉप’ जाण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वर भाष्य केले’, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत हिने दिली.

काश्मिरी हिंदूंची विदारक स्थिती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातून मांडण्यात आली, तरी हे सत्य स्वीकारण्यास ‘सेक्युलर’ जमात अद्यापही सिद्ध नाही आणि धर्मांधांना ते सत्य अन्य हिंदूंना कळू द्यायचे नाही. हिंदूंवरील अत्याचार पाहून काश्मिरी हिंदूंच्या विस्थापित झालेल्या नातलगांनीच नव्हे, तर अन्य हिंदूंनीही या नरसंहाराविषयी अश्रू ढाळून भावना आणि वेदना यांना वाट मोकळी करून दिली. काश्मिरी हिंदूंच्या केवळ काहीच हृदयद्रावक वस्तूनिष्ठ घटना या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. सर्वच घटनांवर प्रकाश टाकायचा झाल्यास दुसरा चित्रपट बनवावा लागू शकेल. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘हा चित्रपट पाहिल्यावर ‘हिंदूजागृती’ बैठका घेण्यात येत आहेत आणि ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करण्यासाठी ‘झुंड’ चित्रपटाचे खेळ आयोजित केले जात आहेत’, असे विधान केले. ‘हिंदू हा चित्रपट पाहून आक्रमक होतील’, असे म्हणणार्‍यांनी ‘चित्रपट पहायला जाणार्‍या हिंदूंवरच आक्रमणे कशी होत आहेत ?’, ‘धर्मांधांचे चित्रपटगृहात धमक्या देण्याचे धारिष्ट्य कसे होते ?’, या प्रश्नांचे उत्तर द्यावे.

राजस्थानमध्ये तर काँग्रेसने ‘जमावबंदी’च केली !

हिंदू संघटित होतील; म्हणून घाबरून कि काय हा चित्रपट करमुक्त करण्यास महाराष्ट्र सरकार सिद्ध नाही आणि राजस्थानमध्ये तर काँग्रेसने ‘जमावबंदी’च केली. हा चित्रपट पाहून हिंदूंनी आक्रमक होऊन धर्मांधांची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली, जाळपोळ केली अथवा धर्मांधांवर आक्रमण करून त्यांना घायाळ केले, ठार केले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य आहे !