पाकच्या कारागृहात अडकले आहेत भारताचे ५७७ मच्छिमार !

गेल्या ५ वर्षांत ९ भारतियांचा पाकच्या कारागृहात मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – पाकिस्तान सरकारने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार पाकच्या कह्यात ५७७ भारतीय मच्छिमार आहेत. १ जानेवारी २०२२ या दिवशी देवाणघेवाण झालेल्या सूचीनुसार पाकिस्तानने ५७७ मच्छिमारांना कह्यात घेतल्याचे मान्य केले आहे. यासह गेल्या ५ वर्षांत ९ भारतीय मच्छिमार पाकिस्तानी कारागृहात मरण पावले, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी राज्यसभेत भाजपचे खासदार महेश पोद्दार यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ष २००८ मध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देश प्रत्येक वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी आपापल्या देशांतील कारागृहात असलेले नागरिक आणि मच्छिमार यांच्या सूचीची देवाणघेवाण करतात.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून वर्ष २०१४ पासून २ सहस्र १४० भारतीय मच्छिमार आणि ५७ भारतीय मासेमारी नौका पाकिस्तानमधून परत आणण्यात आल्या आहेत.