मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील कार्यक्रमात घेतली. मनसेच्या वतीने दादरमधील शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, स्वराज्य उभारणीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पुन्हा सुराज्य व्हावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जाती-जातींमध्ये विभागलेला समाज एक कसा होईल, यासाठी प्रयत्न करू. महिलांना सुरक्षित वाटेल. त्यांचा आत्मसन्मान राहील, असे सुराज्य निर्माण करू.
सुराज्यात युवकांना रोजगार मिळेल, प्रत्येक मूल शाळेत जाईल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील भ्रष्टाचार नाहीसा होईल. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न करू. आम्ही महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो आणि हा धर्म निभावण्याची शपथ घेतो.