होळीला ‘पाणी वाचवा’चे आवाहन करणे, तर बकरी ईदला मटणावर चर्चा करणे, हा आमचा मूर्खपणा होता ! – अभिनेत्री शर्लिन चोप्रा

अभिनेत्री शर्लिन चोप्रा

नवी देहली – एक काळ असा होता की, आम्हीही होळीच्या दिवशी ‘पाणी वाचवा’, ‘प्राण्यांना वाचवा’, अशा प्रकारच्या ‘हॅशटॅग’चा (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) वापर सामाजिक माध्यमांवर करत होतो. दिवाळीच्या दिवशी ‘प्रदूषण थांबवा’, असा संदेश देत होतो, तर दुसरीकडे बकरी ईदच्या वेळी आमच्या आवडीच्या मटणाविषयी चर्चा करत होतो. हळूहळू आमच्या लक्षात आले की, हा मूर्खपणा आहे, अशा शब्दांत अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनी ‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंकेतस्थळाचे सहसंस्थापक महंमद जुबेर यांना सुनावले.

होळीच्या वेळी अभिनेत्री काजोल यांनी ‘पाणी वाचवा’, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ नुकताच प्रसारित केला होता. त्यावर शर्लिन चोप्रा यांनी ट्वीट करत म्हटले होते, ‘अशा प्रकारचे ज्ञान केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच का दिले जाते ?’ त्यावर महंमद जुबेर यांनी चोप्रा यांना उत्तर देतांना चोप्रा यांच्या वर्ष २०१३ मध्ये केलेल्या एका ट्वीटची आठवण करून दिली. यात त्या वेळी चोप्रा यांनी होळीच्या वेळी ‘पाणी वाचवा’, असे आवाहन केले होते. त्यावर शर्लिन चोप्रा यांनी जुबेर यांना वरील शब्दांत उत्तर दिले.