संभाजीनगर – भूमीचा ताबा मिळवण्यासाठी अधिवक्ता किरण राजपूत यांना ठार मारण्याची सुपारी घेतलेल्यांनी त्यांना न मारण्यासाठी उलट १ लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी अधिवक्ता किरण राजपूत यांच्या तक्रारीवरून त्यांची आत्या, विठ्ठल बेडवाल, विजय बेडवाल, चरण राजपूत, शुभम् सोनेत (राजपूत), गजू भांडे, लखन सिरसवाल आणि मनीष लाहोटी या नातेवाइकांच्या विरोधात सातारा (जिल्हा संभाजीनगर) पोलीस ठाण्यात १९ मार्च या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिवक्ता राजपूत यांची सातारा येथे १ हेक्टर ८ आर्. शेतभूमी आहे. अधिवक्ता राजपूत यांच्या आरोपांनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांची आत्या राधा बेडवाल, विठ्ठल बेडवाल आणि त्यांचा मुलगा विजय हे गुंडाच्या साहाय्याने भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. १६ मार्च या दिवशी दुपारी अधिवक्ता राजपूत यांना लखन याने दूरभाष करून ‘मनीष याने भूमी कह्यात घेण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी घेतली असून त्यांना ही सुपारी नातेवाइकांनीच दिली आहे’, असे सांगितले; परंतु भूमी कह्यात घ्यायची नसेल आणि मारहाण करायची नसेल, तर मला १ लाख रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी त्याने चालू केली. त्याने वारंवार दूरभाष करून या धमक्या दिल्या. या धमक्यांच्या ध्वनीमुद्रणासह अधिवक्ता राजपूत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.