विरार येथे दुचाकीची सायकलला धडक, सायकलस्वाराचा मृत्यू !

रंगाचा फुगा लागल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले !

सणांच्या नावाखाली असे विकृत प्रकार करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार बंद होतील ! सणांच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे सातत्याने प्रबोधन करणे, निवेदने देणे आदी माध्यमांतून जनजागृती करत आहे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, १९ मार्च (वार्ता.) – ‘होळी साधेपणाने आणि खबरदारी घेऊन साजरी करा’, असे आवाहन राज्यशासनाने केले होते. विरारमधील आगाशी चाळपेठ येथे काही जण १७ मार्च या दिवशी रस्त्यावरून जाणार्‍या लोकांना विनाकारण फुगे मारून विकृत आनंद साजरा करत होते. रंगाचा फुगा लागल्याने दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला अन् दुचाकीची सायकलला धडक बसली असे समजते. यात सायकलस्वार रामचंद्र पटेल (वय ५४ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी २ दुचाकीस्वारांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. यासंदर्भात माहिती देतांना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्याने अपघात झाला कि नाही याविषयी शंका व्यक्त केली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.